सभापतिपदासाठी अजित पोवार अपात्र
By Admin | Updated: January 2, 2015 00:39 IST2015-01-02T00:39:06+5:302015-01-02T00:39:47+5:30
न्यायालयाचा आदेश : नाईकनवरे यांचा दावा; ‘परिवहन’ निवडणुकीला स्थगिती नसल्याने स्पष्टीकरण

सभापतिपदासाठी अजित पोवार अपात्र
कोल्हापूर : महापालिकेच्या परिवहन सभापतिपदासाठी उद्या, शुक्रवारी विशेष सभेत निवडणूक होत आहे. मात्र, कॉँग्रेस पक्षाचे सभापतिपदाचे उमेदवार अजित पोवार यांच्या अर्जावर सूचक असलेले शशिकांत पाटील हे स्वीकृत सदस्य असल्याने पोवार यांचा अर्ज अपात्र ठरत असल्याचा आदेश जिल्हा कनिष्ठ स्तर न्यायालयाने दिला असल्याची माहिती जनसुराज्य पक्षाचे बंडखोर उमेदवार प्रकाश नाईकनवरे यांनी आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. पोवार यांचा अर्ज अवैध ठरल्यास नाईकनवरे यांची परिवहन सभापतिपदी बिनविरोध निवड होईल. नाईकनवरे व माजी नगरसेवक रमेश पुरेकर यांनी बंडखोरी अर्ज दाखल करताना म्हटल्याप्रमाणे ‘बिनआवाजाचा बॉम्ब’ फोडल्याने महापालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कॉँग्रेस, राष्ट्रवादी व जनसुराज्य पक्षांमध्ये ठरलेल्या सत्तासूत्रानुसार आता येणारे परिवहन सभापतिपद कॉँग्रेसच्या वाट्याला गेले. मात्र, पक्षाने गेली चार वर्षे डावलल्याने नाराज झालेल्या प्रकाश नाईकनवरे यांनी बंडाचे निशाण हाती घेतले; तर जनसुराज्यच्या मृदुला पुरेकर यांनी स्थायी समिती सभापतीची निवडणूक लढविण्याची तयारी केली. यामुळे हडबडलेल्या नेत्यांनी सदस्यांना ‘व्हिप’ बजावून अज्ञातस्थळी रवाना केले. मात्र, पुरेकर व नाईकनवरे यांनी अर्ज दाखल करताना सांगितल्याप्रमाणे आज बिनआवाजाचा बॉम्ब फोडला. माजी नगरसेवक रमेश पुरेकर, दत्ता टिपुगडे, प्रकाश मोहिते उपस्थित होते.
माहिती देताना नाईकनवरे म्हणाले, शशिकांत पाटील हे स्वीकृत सदस्य आहेत. त्यामुळे पाटील यांना प्रत्यक्ष मतदानात सहभागी होता येत नाही, असे असतानाही पाटील हे पोवार यांच्या सभापतिपदासाठीच्या उमेदवारी अर्जावर सूचक आहेत. स्वीकृत सदस्याला मतदानाचा अधिकार नाही, तर सूचक कसे होता येईल? या मुद्द्याच्या आधारे ३१ डिसेंबरला न्यायालयात दाद मागितली. यानुसार पोवार यांना अपात्र ठरविण्याचे आदेश दिले. याबाबत म्हणणे आजच आयुक्त बिदरी यांच्यामार्फत नगरसचिव रणदिवे यांना सादर केले.
दरम्यान, न्यायालयाने पोवार यांचा अर्ज अवैध ठरविताना, निवडणूक प्रक्रियेबाबत भाष्य केलेले नाही. उद्या सकाळी न्यायालयाच्या अधिकृत निकालाची प्रत प्रशासनाला पोहोच होईल. निवडणुकीसाठी स्थगिती नसल्याने उद्या, शुक्रवारी ठरल्याप्रमाणे निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागेल. पोवार यांचा अर्ज अवैध ठरल्याने सभापतिपदी बिनविरोध आपलीच वर्णी लागेल, असे नाईकनवरे यांनी स्पष्ट केले.