प्लँचेट अहवालाबाबत अजित पवार अनभिज्ञ
By Admin | Updated: February 26, 2015 00:53 IST2015-02-26T00:50:19+5:302015-02-26T00:53:08+5:30
गुलाबराव पोळ यांच्या वकिलांचा टोला

प्लँचेट अहवालाबाबत अजित पवार अनभिज्ञ
कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणाच्या तपासात तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी प्लॅँचेटचा वापर केला नसल्याचा चौकशी अहवाल शासनाला प्राप्त झालेला आहे. कदाचित त्यांच्याच सरकारने नेमलेल्या अधिकाऱ्यांचा अहवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहीत नसावा, असा टोला गुलाबराव पोळ यांचे वकील अॅड. प्रकाश मोरे यांनी बुधवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत लगावला. डॉ. दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी पोळ यांनी प्लॅँचेटचा वापर केल्याची तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलिसांत केली होती. यावर तत्कालीन सरकारने अप्पर पोलीस महानिरीक्षक व्ही. डी. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने अहवाल दिला असून, यामध्ये दाभोलकर यांच्या तपासात पोळ यांनी प्लॅँचेटचा वापर केला नसल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आल्याचे अॅड. मोरे यांंनी सांगितले. चौकशीदरम्यान अर्जदार, साक्षीदार, गैरअर्जदार यांचे जबाब नोंदविले. तसेच गोपनीय माहिती काढली असता, डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासासाठी प्लॅँचेट, सुपरनॅचरल पॉवर, सियान्स, तंत्रमंत्र विद्येचा वापर झाल्याचे निष्पन्न होत नाही. त्याबाबत कोणताही सबळ अथवा ठोस पुरावा चौकशीअंती दिसून आला नसल्याचे अहवालात म्हटले आहे, असेही त्यांनी सांगितले.
पुणे येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्लॅँचेटप्रकरणी गुलाबराव पोळ यांची बदली केल्याचा खळबळजनक आरोप केल्याबद्दल विचारले असता, अॅड. मोरे म्हणाले, गुलाबराव पोळ यांची बदली ४ मार्च २०१४ झाली आणि प्लॅँचेटची तक्रार जुलै २०१४ मध्ये झाली. दोन्ही घटनांमध्ये तीन महिन्यांचे अंतर असल्याने अजित पवार यांचे वक्तव्य वस्तुस्थितीला धरून नाही. कदाचित त्यांच्या सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल त्यांना माहीत नसेल.