अजित कर्णेला वेध ‘युनिक रेकॉर्ड’चे
By Admin | Updated: July 12, 2014 00:42 IST2014-07-12T00:39:43+5:302014-07-12T00:42:24+5:30
आर्थिक मदतीची गरज : एका मिनिटात डोक्याने ५१ विटा फोडणार

अजित कर्णेला वेध ‘युनिक रेकॉर्ड’चे
शिवाजी कोळी : वसगडे, वयाच्या बाराव्या वर्षी मित्राने डोक्यात वीट फेकून मारली. वीट फुटली; पण डोक्याला काहीच इजा झाली नाही. घटना भयंकर असली तरी मार्शल आर्ट कलेचे आकर्षण निर्माण झाल्याने गांधीनगर (ता. करवीर) येथील अजित पोपट कर्णे या युवकाने जिद्दीने कलाच आत्मसात केली. एका मिनिटात ५१ विटा डोक्याने फोडून ‘युनिक रेकॉर्ड’ करू इच्छिणाऱ्या ध्येयवेड्या अजितला आर्थिक मदतीची गरज आहे.
अजित कर्णे सातवीच्या वर्गात शिक्षण घेत असताना शाळेतील भांडणातून एका मित्राने त्याच्या डोक्यामध्ये वीट फेकून मारली. ती वीट फुटली; पण अजितच्या डोक्याला काहीही जखम झाली नाही. त्यानंतर मार्शल आर्ट या कलेबद्दल आकर्षण निर्माण होऊन त्याने सलग तीन वर्षे जिद्दीने डोक्याने वीट फोडण्याचा सराव केला.
दरम्यान, अजितचे वडील पोपट कर्णे यांच्या पायावर मशीन पडून त्या दुर्घटनेत ते एका पायाने अपंग झाले. त्यामुळे वयाच्या बाविसाव्या वर्षी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अजितवर पडली. त्यावेळी वडिलांनी अजितला प्रोत्साहन देऊन त्याला अखंड सराव करण्यास भाग पाडले. सध्या जिथे बांधकाम सुरू असेल, त्या ठिकाणी अजित ‘डेमो’चा सराव करतो. त्यावेळी संबंधित मालकाकडून बक्षीस आणि प्रोत्साहन मिळत असल्याचे कर्णे याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
२०१० सालच्या गणपती उत्सवात एका मिनिटात ४१ विटा डोक्याने फोडून अजितने विक्रम केला. सध्या तो एका मिनिटात साठच्यावर विटा डोक्याने फोडतो. मार्शल आर्टची कला आत्मसात केली असली तरी घरची परिस्थिती हलाखीची असलेल्या अजितला युनिक रेकॉर्डमध्ये नाव नोंदविण्याचे ध्येय असल्याने त्याला आर्थिक मदतीचे आवाहन कोल्हापूर कराटे-दो असोसिएशनचे अध्यक्ष कपिल केसरकर यांनी केले आहे.