अजिंक्य चव्हाण अखेर राष्ट्रवादीतून लढणार
By Admin | Updated: September 6, 2015 00:37 IST2015-09-06T00:37:14+5:302015-09-06T00:37:14+5:30
‘पद्माराजे उद्यान’ प्रभाग : शहर युवा सेनेला ‘जय महाराष्ट्र’

अजिंक्य चव्हाण अखेर राष्ट्रवादीतून लढणार
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यान प्रभागात शनिवारी दिवसभरात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर कोल्हापूर शहर युवा सेनेच्या अधिकारीपदाचा राजीनामा देऊन अजिंक्य शिवाजीराव चव्हाण यांनी अखेर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या प्रभागातून राष्ट्रवादीची उमेदवारी अजिंक्य चव्हाण यांनाच मिळणार हे आता स्पष्ट झाले. ताराराणी आघाडीचे उमेदवार विक्रम जरग यांच्याशी त्यांची आता लढत होईल. शिवसेनेची उमेदवारी महेश चौगुले यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
शिवसेनेतील युवा सेनेचे पदाधिकारी असलेल्या अजिंक्य चव्हाण यांनी पद्माराजे उद्यान प्रभागातून निवडणूक लढविण्याचा निर्णय महिन्यापूर्वी घेतला होता. चव्हाण यांच्या या निर्णयामुळे याच प्रभागातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुनीता राऊत यांचे पती अजित राऊ त तसेच सम्राट कोराणे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती. तिघेही वेताळ तालीम परिसरातील असल्याने आणि चव्हाण घराण्याचा मान राखायचा यासाठी राऊत व कोराणे यांनी लढण्यास असमर्थता दाखविली. परंतु माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी, तुम्ही जर अजिंक्यसाठी थांबत असाल तर त्यांना आपल्या पक्षाची उमेदवारी घ्यायला सांगा अशी अट घातली.
जर हे शक्य झाले नाही तर अजित राऊत यांना लढावेच लागेल असेही बजावले होते. त्यामुळे गेले काही दिवस स्वत: अजित राऊत, उत्तम कोराणे, सम्राट कोराणे हे चव्हाण कुटुंबीयांचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यास शनिवारी यश आले. अजिंक्य चव्हाण यांनी दुपारी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे कोल्हापूर शहर युवा सेना अधिकारीपदाचा राजीनामा पाठवून दिला. घरगुती व वैयक्तिक कारणामुळे आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्रात त्यांनी म्हटले आहे. ही बातमी शिवाजी पेठेत वाऱ्यासारखी पसरली. रात्री साडेआठ वाजता अजिंक्य चव्हाण, राऊत, कोराणेंसह शिवाजी पेठेतील सुमारे १०० कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मिरवणुकीने शासकीय विश्रामगृहावर गेले. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात त्यांनी प्रवेश केला. मुश्रीफ यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शहराध्यक्ष राजेश लाटकर, प्रा. जयंत पाटील उपस्थित होते.
अजिंक्य चव्हाण हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झाले. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामभाऊ चव्हाण यांचा अजिंक्य पुतण्या आहे. त्यामुळे रामभाऊ चव्हाण कोणाकडून प्रचारात उतरणार हा पुढच्या काळात औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.
अजित राऊत यांची माघार
अजिंक्य राष्ट्रवादीतून निवडणूक लढविणार असल्याने नगरसेवक अजित राऊत यांनी रिंंगणातून माघार घेतल्याचे जाहीर केले. निवडणूक लढविण्याबाबत त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव होता. चांगला लोकसंपर्क आणि विकासकामांमुळे प्रभागात त्यांच्याबद्दल लोकमत चांगले होते. त्यांनी रिंगणातून धक्कादायक माघार घेतल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १० आॅगस्टला दिले होते. त्यावर शनिवारच्या घडामोडींनी शिक्कामोर्तब केले.(प्रतिनिधी)