आजऱ्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची कसोटी
By Admin | Updated: May 23, 2015 00:37 IST2015-05-22T21:23:18+5:302015-05-23T00:37:02+5:30
तालुका संघ निवडणूक : मातब्बर मंडळी आली एकत्र; अशोक चराटींची राष्ट्रवादीपासून वेगळी चूल

आजऱ्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची कसोटी
ज्योतीप्रसाद सावंत- आजरा -आजरा तालुका खरेदी-विक्री संघाची जुलै महिन्यात निवडणूक होत असून, जिल्हा गोकुळचे संचालक रवींद्र आपटे, जिल्हा बँकेचे संचालक अशोकअण्णा चराटी, शिवसेनेचे प्रा. सुनील शिंत्रे, संभाजी पाटील, आजरा कारखान्याचे अध्यक्ष विष्णुपंत केसरकर, उपाध्यक्ष मारुती घोरपडे अशी मातब्बर मंडळी एकत्र आल्याने राष्ट्रवादीची जिल्हा बँकेनंतर पुन्हा एकवेळ कसोटी आहे.
गेली दोन वर्षे राष्ट्रवादींतर्गत धुमसणाऱ्या वादाचे पर्यवसान राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पाडण्यात झाले आहे. बेरजेच्या राजकारणात लवचिक भूमिका ठेवणाऱ्या अशोक चराटी यांच्या बाजूने विधानसभेनंतर बँकेच्या राजकारणात फासे पडले आहेत. संस्थांचा भक्कम आधार, प्रचंड मनुष्यबळाच्या जोरावर चराटींचा राजकीय आलेख उंचावत आहे. सुधीर देसाई, उदय पवार आणि रणजित देसाई यांच्यावर ठपका ठेवत राष्ट्रवादीपासून वेगळी चूल चराटी यांनी मांडली. यामध्ये तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई व अशोकअण्णा यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला.
अण्णा-भाऊ गटाने तालुका खरेदी-विक्री संघात वेळोवेळी प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला; पण आजतागायत त्यांच्या हाती काहीही लागले नाही. मात्र, सद्य:स्थितीस वातावरण पोषक आहे. सत्तारूढ संचालक मंडळातील अनेक संचालक चराटी यांच्या गळाला लागले आहेत. स्थानिक कार्यकर्ते तालुक्याबाहेरच्या वरिष्ठ नेत्यांना फारसे जुमानेसे झाले आहेत. के. पी. यांच्याकडे आमदारकी नाही. मुश्रीफ यांच्याकडे मंत्रिपद नाही, तर संध्यातार्इंना स्थानिक राजकारणात हस्तक्षेप करण्याची इच्छाच नाही. यामुळे कार्यकर्तेही निवांत आहेत.
खरेदी-विक्री संघ हे विरोधकांनी ‘लक्ष्य’ बनवले आहे. यामुळे सत्तारूढ मंडळींना सावध पावले टाकावी लागणार आहेत. आजरा विकास आघाडीने नेटक्या उमेदवारांना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे उमेदवार निवडीपासूनच दक्षता घ्यावी लागणार आहे. विरोधकांना पक्षाच्या लेबलची चिंता नाही. कोणत्याही पक्षाचे अथवा गटाचे वावडे नाही. यामुळे सत्ताधाऱ्यांच्या आधीच विरोधकांनी सर्वपक्षीय मोट बांधली आहे. आता हे आव्हान राष्ट्रवादीला डोकेदुखी ठरणार यात शंका नाही.
नेमके सत्ताधारी कोण ?
तालुका संघ अध्यक्षपद निवडीमध्ये अशोकअण्णांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. बहुतांश संचालक अशोकअण्णांचे नेतृत्व मानणारे असल्याने सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण? याबाबत सध्यातरी संभ्रमावस्था आहे.
व्यक्ती सभासद गटात चुरस
सुमारे दहा हजार व्यक्ती सभासद असून, या गटातून सहा जागा निवडल्या जाणार आहेत. बहुतांश विद्यमान संचालकांनी व्यक्ती सभासदांत वाढ केली आहे. विद्यमान संचालकांत फूट पडल्याने व्यक्ती सभासद गटात प्रचंड चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत.