आजऱ्यात पी. एम. किसान योजनेतील बोगस लाभार्थ्यांकडून अद्यापही वसुली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST2021-02-05T06:59:46+5:302021-02-05T06:59:46+5:30
आजरा : आजरा तालुक्यात पी. एम. किसान योजनेचे ११३७ बोगस लाभार्थी आहेत. त्यापैकी ९१४ करदाते व अन्य २५३ लाभार्थी ...

आजऱ्यात पी. एम. किसान योजनेतील बोगस लाभार्थ्यांकडून अद्यापही वसुली नाही
आजरा
: आजरा तालुक्यात पी. एम. किसान योजनेचे ११३७ बोगस लाभार्थी आहेत. त्यापैकी ९१४ करदाते व अन्य २५३ लाभार्थी आहेत. २५३ करदात्यांकडून २३ लाख ५० हजारांची रक्कम वसूल केली आहे. मात्र, ६६१ करदात्यांकडून ६१ लाख १८ हजार व अन्य २५३ बोगस लाभार्थ्यांकडून १ लाख ४५ हजार २०० अशी एकूण ७२ लाख ६३ हजार २०० रुपयांची रक्कम अद्यापही वसूल झालेली नाही. चुकीची माहिती देऊन शासनाची फसवणूक केलेल्या लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा आजरा तहसीलदार विकास अहिर यांनी दिला आहे. मात्र, बोगस करदात्यांकडून वसुली नाही व फौजदारी गुन्हाही दाखल झालेला नसल्यामुळे प्रामाणिक लाभार्थ्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. गरीब शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी देशात पी. एम. किसान योजना राबविण्यात आली. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे, अशा शेतकऱ्यांना चार महिन्याला दोन हजार असे वर्षाला सहा हजार दिले जातात. मात्र, यामध्ये करदाते कर्मचारी व एकाच कुटुंबातील अन्य व्यक्तींनाही लाभ मिळाल्याचे तक्रारीनंतर लक्षात आले. बोगस लाभार्थी शोधण्यासाठी नायब तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली अव्वल कारकून, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पाटील यांची समिती नियुक्त केली. समितीच्या गाववार केलेल्या सर्व्हेमध्ये ९१४ करदाते, तर अन्य २२३ असे एकूण ११३७ लाभार्थी अपात्र ठरविले. त्यांच्याकडून वसुलीसाठी नोटिसा लागू केल्या. त्यापैकी फक्त २५३ बोगस लाभार्थ्यांनी २३ लाख ५० हजार जमा केले. मात्र, अपात्र असलेले ८८४ बोगस लाभार्थ्यांकडून अद्यापही ७२ लाख ६३ हजारांची रक्कम वसूल झालेली नाही. अशा बोगस लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून तातडीने रक्कम वसूल करण्याची गरज आहे.
* पात्र लाभार्थी अद्यापही वंचितच
तालुक्यात पी. एम. किसान योजनेच्या नियम व अटी पूर्ण करणारे अनेक कुटुंबे आहेत. मात्र, अशा गरीब कुटुंबांना या योजनेच्या लाभापासून अजूनही वंचितच ठेवले आहे. अनेक गावांत एकाच कुटुंबातील पती-पत्नी, मुलगा, मुलगी यांना जमीन नावावर असल्याने योजनेचा लाभ मिळाला आहे.
* बोगस लाभार्थ्यांवरील कारवाईकडे लक्ष
करदाते व अन्य बोगस लाभार्थ्यांनी ८६ लाख १३ हजारांची शासनाची फसवणूक केली आहे. करदात्या बोगस लाभार्थ्यांना नोटिसा पाठविल्या, पण अन्य लाभार्थ्यांना याबाबतची कोणतीही सूचना अद्यापही दिलेली नाही. बोगसगिरीकडून शासनाचे पैसे उकळणाऱ्या अशा लाभार्थ्यांवर कारवाई कधी होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.