नावीन्याची आस जागवणारा ‘अभिआस’
By Admin | Updated: January 1, 2015 00:04 IST2014-12-31T23:33:10+5:302015-01-01T00:04:47+5:30
वाचक चळवळीस बळ : स्त्रियांनी नवीन वाचावे यासाठी प्रयत्न; सदस्यांची होते वैचारिक जागृती

नावीन्याची आस जागवणारा ‘अभिआस’
प्रिया दंडगे - कोल्हापूर -स्त्रिया म्हटलं की, त्यांचा बहुतेक वेळ साड्या, दागिने, नटणे-मुरडणे या गोष्टींवर खर्च होतो, असा सार्वत्रिक समज दूर करत गेली ३५ वर्षे येथे नियमितपणे दर्जेदार पुस्तकांचे वाचन आणि त्यावरील चर्चा करणारा बहुसंख्य स्त्रिया असलेला ‘अभिआस’ हा ग्रुप कार्यरत आहे. ही समाजमनाला दिलासा देणारी बाब आहे.
प्राचार्या लीलाताई पाटील यांनी सृजन आनंद विद्यालयाची स्थापना १९८५ मध्ये केली त्याचवेळी वाचनप्रेमींना एकत्र करून या ग्रुपची सुरुवात केली. स्त्रियांनी विचार करावा, बुद्धीला ताण द्यावा, प्रत्येक कृती करण्यापूर्वी विचार करावा, ही लीलातार्इंची त्यामागील भूमिका होती. ‘अभिआस’ याचा अर्थ नावीन्याची आस. स्त्रियांनी नवीन लेखक वाचावेत, आपापसांत वैचारिक चर्चा करावी, सुजाण पालकत्व निभवावं, असं लीलातार्इंना वाटत होतं. त्यातूनच त्यांनी ‘अभिआस’ची सुरुवात केली. त्यात जराही खंड न पडता ही वाचन चळवळ अव्याहतपणे सुरू केली आहे.
महिन्यातून एकदा एका सभासदाकडे सगळेजण जमतात, आधी ठरलेले पुस्तक सगळेजण वाचून येतात आणि त्या पुस्तकावर एकजण बोलतो. त्यानंतर पुस्तकावर चर्चा होते. जी काही चर्चा होते, ती लिहून काढली जाते. या मासिक बैठकीमध्ये अनेकवेळा लेखकांचाही सहभाग असतो. राजन गवस, रेणू गावस्कर, श्याम मनोहर, डॉ. अनिल अवचट ,
डॉ. तारा भवाळकर अशा लेखकांसोबत ‘अभिआस’च्या वैचारिक गप्पा रंगल्या आहेत.
कधी एका विशिष्ट विषयावर मान्यवर वक्त्याला पाचारण करून त्याचे विचार ऐकले जातात. दरवर्षी
८ मार्च महिला दिनानिमित्त दर्जेदार कार्यक्रम घेतले जातात. ज्योती सुभाष व अमृता सुभाष यांचा ‘काळोखाच्या लेकी’, महिलांच्या स्वच्छतागृहाच्या प्रश्नावर भाष्य करणारे ‘वुमनिया’ हे नाटक, ‘कर्तृत्ववान स्त्रिया’हा मुक्त आविष्कार असे कार्यक्रम ‘अभिआस’ने कोल्हापुरातील रसिकांसाठी केले आहेत. नीमाताई पोतनीस, उषा कल्याणकर, सुमित्रा जाधव, आशा आठल्ये, डॉ. उदयप्रकाश संत, डॉ. नीना संत या बुजुर्ग सभासदांबरोबरच तनुजा शिपूरकर, सुप्रिया काळे, अर्चना देसाई, अशी तरुण पिढीतील मंडळीही ‘अभिआस’मध्ये सामील होत गेली आहेत.
सर्वांसाठी खुला ग्रुप
साधारणपणे तीसजणांचा हा ग्रुप वाचन करणाऱ्या सर्वांसाठी खुला आहे. त्याला कुठलेही शुल्क नाही. फक्त वाचनाच्या आनंदात डुंबणारी ही मंडळी महिन्यातील दोन तास सृजनांच्या सहवासात रमली आहेत.