बड्या नेत्याच्या पाठिंब्याचे विमान कोसळले
By Admin | Updated: August 1, 2015 00:34 IST2015-08-01T00:29:26+5:302015-08-01T00:34:04+5:30
इस्लामपूर बाजार समिती विश्लेषण : जयंतरावांपुढे सर्वपक्षीय विरोधकांचा धुव्वा

बड्या नेत्याच्या पाठिंब्याचे विमान कोसळले
अशोक पाटील -इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्याविरोधात सर्वपक्षीय विरोधक एकवटले होते. त्यामुळे निवडणूक चुरशीची ठरणार असे चित्र होते. मात्र पाटील यांच्या राजारामबापू शेतकरी विकास पॅनेलने विरोधकांचा धुव्वा उडवत ‘नाद करायचा नाय’ असे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब कोरे यांना शहरातील बड्या नेत्याने छुपा पाठिंबा दिला होता, परंतु त्या नेत्याची ताकद दिसलीच नाही. त्यामुळे पाठिंब्याचे हे विमान सपशेल कोसळले.
मर्यादित सभासद असलेल्या इस्लामपूर बाजार समितीची निवडणूक चुरशीची होणार, असे चित्र विरोधकांनी तयार केले होते. परंतु मतदार संघातील सहकारी संस्था, सोसायट्या, ग्रामपंचायती, प्रक्रिया संस्था आदींवर जयंत पाटील यांच्या समर्थकांचे वर्चस्व आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला निवडणुकीत एकतर्फी विजय मिळविण्यात काहीही अडचण आली नाही.
काळमवाडी येथे निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ करताना जयंत पाटील यांनी, या निवडणुकीत विजय निश्चित आहे, परंतु तो उच्चांकी असायला हवा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. कार्यकर्त्यांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकतर्फी विजय मिळवून दिला.
व्यापारी गटात दोन जागांसाठी पाच उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादीतील बाळासाहेब कोरे यांनी बंडखोरी करून ‘विमान’ या चिन्हावर निवडणूक लढविली होती. त्यांना पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा होती. त्यामुळे विजयभाऊ पाटील यांचे अंतर्गत विरोधक माजी नगराध्यक्ष अॅड. सुधीर पिसे यांचे समर्थक राजारामबापू शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार माणिक गायकवाड यांचा पराभव होणार, अशी चर्चा होती. मात्र जयंत पाटील यांनी एका रात्रीत सर्व घडामोडी करीत गायकवाड व शामसुंदर पाटील यांनाच निवडून आणण्याचा आदेश दिला. त्यामुळे गायकवाड (८७0 मते) व पाटील (७५९ मते) विजयी झाले. विरोधी काँग्रेसचे विजय पवार यांना तिसऱ्या क्रमांकाची ६८0 मते मिळाल्याने त्यांचे विमान सपशेल कोसळले.(प्रतिनिधी)
इस्लामपूर मतदारसंघात प्रथमच जयंत पाटील यांच्याविरोधात सर्वपक्षीय युवकांची फळी निर्माण झाली आहे. मतदारसंघातील सर्व संस्थांवर जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. मतदारही ठराविक असल्याने राष्ट्रवादीचा विजय निश्चित होता. परंतु आगामी काळात जनतेतून होणाऱ्या निवडणुकीला आम्ही आव्हान देऊ.
- सी. बी. पाटील, संचालक, जिल्हा बँक.
- राहुल महाडिक, माजी जिल्हा परिषद सदस्य
राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब कोरे यांना माझा पाठिंबा नव्हता. निवडणुकीच्या प्रचारात माझा काहीही संबंध नाही. राष्ट्रवादीचे सर्वच नेते, कार्यकर्ते एकदिलाने प्रचारात सामील होते. त्यामुळेच बाजार समितीवर आमचे नेते जयंत पाटील यांचेच वर्चस्व राहिले आहे.
- विजयभाऊ पाटील, पक्षप्रतोद
पक्षप्रतोद विजय पाटील यांचे असे उद्योग १९९१ पासून सुरू आहेत. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष उमेदवार उभे करण्याच्या खेळ्या ते नेहमीच खेळतात. परंतु सभासद, व्यापारी आदी जयंत पाटील यांनाच मानणारे आहेत, हे विजय पाटील यांनी समजून घ्यावे.
- अॅड. सुधीर पिसे, माजी नगराध्यक्ष