‘डॉल्बी’वर हवा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा -- लोकमत व्यासपीठ
By Admin | Updated: September 11, 2014 00:14 IST2014-09-10T22:09:25+5:302014-09-11T00:14:10+5:30
डॉल्बीमुक्तीकडे चला : ‘लोकमत’च्या व्यासपीठावर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मांडले परखड विचार

‘डॉल्बी’वर हवा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा -- लोकमत व्यासपीठ
सातारा : डॉल्बीचा दणदणाट हे तीन बळी घेणाऱ्या दुर्घटनेचे अनेकातील एक कारण आहेच; त्यामुळे डॉल्बीमुक्तीच्या दिशेने आता वाटचाल सुरू झालीच पाहिजे, असे मत मान्यवरांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर मांडले. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन उत्सवांसाठी आचारसंहिता ठरविण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे विचार यावेळी मांडण्यात आले.
सोमवारी गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना राजपथावर दुमजली इमारतीची भिंंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला. या घटनेला डॉल्बी जबाबदार असल्याचा आक्षेप अनेकांनी घेतला, तर इमारतच जुनी आणि जीर्ण असल्याने ती कोसळली, असाही मतप्रवाह आहे. याबाबत वस्तुस्थिती काय, जबाबदारी कोणाची, या निमित्ताने भविष्यात काय करायला हवे, याबाबत ‘लोकमत’ने परिचर्चेचे आयोजन केले होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या चर्चेत भाग घेतला आणि मनमोकळेपणाने मते मांडली. दुर्घटनेस डॉल्बी कितपत कारणीभूत आहे, याचे संशोधन होऊन संबंधितांना शिक्षा व्हावी आणि या निमित्ताने डॉल्बीमुक्तीच्या दिशेने सातारकरांनी पावले टाकावीत, असे मत मांडण्यात आले.
कोणत्याही घटनेचे पहिले पडसाद राजपथावर उमटत असल्याने तेथील नागरिकांना सर्वप्रथम दुष्परिणामांना सामोरे जावे लागते आणि ते रोखण्याची जबाबदारी प्रशासनाचीच आहे. संबंधित इमारत धोकादायक होती; मात्र ती उतरवायला सुरुवातही केली होती. गणेशोत्सवामुळे काम बंद ठेवण्यात आले होते. इमारत त्यामुळे अधिक धोकादायक झाली आहे, हे पालिकेला माहीत होते. तरीही पालिकेने ती का पाडली नाही, असा सवाल करण्यात आला. बोले यांची वडापावची गाडी नेहमी फूटपाथवर उभी असायची. पोलिसांनी त्यांना बोळात गाडी लावायला भाग पाडले. पालिकेची माणसे मिरवणुकीत फिरत होती असे सांगितले जाते. धोकादायक भिंंतीलगत उभी असलेली वडापावची गाडी आणि भोवतालच्या माणसांना धोका आहे, हे पालिकेच्या माणसांना दिसले नाही का, अशीही विचारणा झाली.
मोती चौक ते देवी चौक या टापूत एकाच वेळी आठ-दहा डॉल्बी सुमारे तीन तास दणाणत होत्या, हे वास्तव राजपथावरील रहिवाशाच्याच तोंडून बाहेर पडले. त्यांची एकत्रित कंपने किती झाली असतील, असाही मुद्दा आला. शिवाय मोठे गणपती रस्त्यावर असल्यामुळे विद्युत तारांना असलेला धोका लक्षात घेऊन राजपथावरील वीजपुरवठा चार तास खंडित केला होता. मोठे गणपती करू नका म्हणून एवढे प्रबोधन होऊनही कुणी ऐकले नाही आणि त्यामुळे मिरवणुकीवेळी अंधार करावा लागला, याबद्दलही नाराजी व्यक्त झाली.
घटना कुणामुळे घडली हे न पाहता अशा घटना घडू नयेत म्हणून भविष्यात काय करता येईल, यावर भर द्यावा, असाही एक मतप्रवाह आहे. पूर्वी पालिका आणि मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून उत्सव कसा असावा, याचे नियोजन होत होते. ही प्रथा वीस वर्षांपासून बंद असल्याने अंकुश राहिलेला नाही. तसा अंकुश पुन्हा निर्माण केला, तर अशा घटना टाळता येतील, असा सल्ला देण्यात आला. डॉल्बीने आवाजाचे उल्लंघन केले म्हणून केवळ गुन्हे दाखल न करता, आवाज वाढल्याचे दिसताच पोलिसांनी तातडीने तो कमी करण्यास सांगायला हवे, असेही मत पुढे आले.
डॉल्बीचे प्रस्थ आल्यापासून तरुणांचा ओढा त्याकडेच आहे. वरिष्ठ कार्यकर्त्यांचे म्हणणे तरुण कार्यकर्ते ऐकत नाहीत. डॉल्बीसमोर कार्यकर्ते कमी आणि येणारे-जाणारेच जास्त नाचतात. त्या निमित्ताने जुने हिशोब निघतात आणि तणाव, मारामाऱ्या होतात. कायद्यांचे कडक पालन करा आणि उल्लंघन झाल्यास डॉल्बीच जप्त करा, असा विचार पुढे आला. डॉल्बीमुळे काँक्रिटची घरेही हलतात, हे नक्की. त्यामुळे सोमवारच्या घटनेतून डॉल्बीला दोषमुक्त करता येणार नाही.
तरुणाई डॉल्बीकडे वळण्याच्या मानसिक कारणांचा आणि तिच्या दुष्परिणामांचाही वेध घेण्यात आला. अभिव्यक्तीची गरज म्हणून डॉल्बी जवळची वाटते; परंतु तिच्यासमोर नाचताना उतावीळपणा कमी न होता वाढतो. माणूस स्वत:ला उधळून देतो. एरवीचे ताणतणाव विसरू पाहत असतानाच त्याच्यात पशुतत्त्व जागे होते. परंतु शंभर डेसिबलच्या पुढील आवाजामुळे मेंदू, हृदय आणि कानांना धोका संभवतो. हे धोके टाळण्यासाठी डॉल्बी टाळलेलीच बरी, असे मत व्यक्त करण्यात आले.
‘लोकमत’ने विसर्जनाविषयी प्रबोधन केल्यानंतर आता डॉल्बीसंदर्भात खुली चर्चा घडवून आणल्याबद्दल मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. शिवाजी पार्कवरील सभेमुळे डेसिबलच्या मर्यादा ओलांडल्या जात असतील, तर डॉल्बीमुळे त्यांचे उल्लंघन नक्कीच होते. मर्यादा तोडणाऱ्या डॉल्बी सिस्टिम सरळ जप्तच कराव्यात. तसे फलक पालिकेने शहरात लावावेत. जिल्हाधिकारी, पालिका, पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन उत्सवाची आचारसंहिताच तयार करण्याची वेळ आली आहे, या भूमिकेवर चर्चेची सांगता झाली. (लोकमत टीम)
हे आहेत दुष्परिणाम
सव्वाशे डेसिबलपेक्षा जास्त आवाज ऐकत राहिल्यास मेंदू, हृदय आणि कानाला गंभीर धोका उत्पन्न होतो. काहीजणांना कायमचे बहिरेपण येण्याची शक्यता असते. डॉल्बीमुळे छातीची धडधड सतत वाढत राहते. मानसिक थकवा आणि ताण वाढत जातो. रक्तदाब वाढतो. या साऱ्याचा अतिरेक झाल्यास हृदय आणि मेंदूला गंभीर धोका संभवतो. अनेकदा आकस्मिक मृत्यूही होऊ शकतो. अशा घटना यापूर्वी घडल्या आहेत. पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेली बालके आणि साठ वर्षांवरील वृद्धांना डॉल्बीचा धोका सर्वाधिक असतो.
अशी लागते डॉल्बीची चटक
अभिव्यक्ती ही अन्नाइतकीच माणसाची गरज आहे. त्यासाठी तो माध्यम शोधतो आणि डॉल्बीत त्याला प्रेरित, कार्यप्रवण होण्यासाठी शक्ती सापडते.
लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यासाठी विधायक माध्यम न वापरता विघातक डॉल्बी वापरली जाते.
निर्मिती, विवेक, सृजनातून अलौकिक आनंदाबरोबरच संस्कार मिळतात; मात्र डॉल्बीतून केवळ उतावीळपणा वाढत जातो. दारू पिल्याने तो दुप्पट वाढतो.
नाचता-नाचता माणसाचे नाडीचे ठोके वाढतात, तणाव निवळतात; पण याच प्रक्रियेत माणूस उद्विग्नही होतो आणि त्याच्यातील पशुत्व जागे होते.
पालिकेने इमारत मालकाला नोटीस दिली असेल, तर जबाबदारी पालिकेचीच आहे; कारण नोटीस देऊनही इमारत पाडली गेली नाही, तर ती पालिकेने पाडायला हवी होती. त्यामुळे पालिका प्रशासनावरही गुन्हा दाखल करायला पाहिजे. सर्वांनीच नैतिकता पाळून डॉल्बी इतिहासजमा करावी.
- प्रकाश गवळी, अध्यक्ष, गुरुवार तालीम संघ
==
साठ वर्षांपेक्षा कमी आणि पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या कोणत्याही व्यक्तीला डॉल्बीचा त्रास होणारच. सोमवारच्या दुर्घटनेप्रकरणी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. मदतकार्यासाठी धावून आलेल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना बोलावून प्रशासनाने त्यांचे कौतुक करावे.
- गुरुप्रसाद सारडा, अध्यक्ष, व्यापारी सहकारी पतसंस्था
==
डॉल्बीला परवानगी देणार नाही, असा पवित्रा प्रशासनाकडून दरवर्षी घेतला जातो आणि नंतर मुभा दिली जाते. आता एकमेकांवर जबाबदारी न ढकलता सर्वांनी एकत्र येऊन डॉल्बीविरुद्ध प्रबोधन करावे. मंडळांनी सामाजिक भान ठेवून मधुर वाद्यांचा वापर करावा व भविष्यकाळ उज्ज्वल करावा.
- बाळासाहेब बाबर, विरोधी पक्षनेते, सातारा पालिका
==
सोमवारी दुर्घटना घडल्यानंतरही रात्री १२ वाजेपर्यंत अनेक ठिकाणी डॉल्बी वाजत होत्या. सातारकरांच्या संवेदना बोथट होतायत की काय, असाच प्रश्न ते ऐकून निर्माण झाला. डॉल्बीची सुपारी ८० हजार ते १ लाख रुपये असते. एवढा खर्च करून त्रास कशासाठी? डॉल्बीवर बंधन घातलेच पाहिजे.
- नीलेश पंडित, जयहिंद मंडळ
==
उत्सवाकडे आजकाल केवळ चैन, मौज, मजा म्हणून बघितले जाते. स्वत:ला उधळून दिले जाते. उत्सवामुळे विवेक, संयम वाढीस लागायला हवा; मात्र तो कमीच होताना दिसतो. डॉल्बीच्या तालावर संघटितपणे अभिव्यक्ती करण्यातून चांगले काहीच घडणार नाही; उलट तोटेच अधिक होतील.
- मल्लिका पाटणकर, मानसतज्ज्ञ
==
जुन्या काळातील उत्सव आता का दिसत नाही, याचा विचार करावा. तरुणांमधील बेरोजगारी आणि वैफल्य यामधूनच डॉल्बीच्या तालावर नाचण्याचे प्रकार जन्माला येत आहेत. व्यवस्था, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तरुणांना पर्याय दिला पाहिजे. अभिव्यक्तीची सकस माध्यमे उपलब्ध केली पाहिजेत.
- वसंत नलावडे, कामगार नेते
==
डॉल्बीने पक्क्या इमारतीही हादरतात, खिडकीच्या काचा थरारतात; फुटतात हे सर्वांनी पाहिले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील ध्वनिलहरी सहन केल्यानंतर हृदय, मेंदू आणि कानावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होतात. एवढेच नव्हे तर मानसिक आरोग्यही बिघडत असल्याने डॉल्बी टाळलेलीच बरी.
- डॉ. आर. डी. कुलकर्णी, वैद्यकीय व्यावसायिक