कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात अंबाबाई मंदिर आवारात सीसीटीव्हीद्वारे बसविण्यात येणाऱ्या एआय तंत्रज्ञानामुळे सराईत गुन्हेगारांचे चेहरे भर गर्दीतही कॅमेऱ्यांमध्ये नोंद होणार आहेत. त्यामुळे पाकीटमारीसह भाविकांचे दागिने, मोबाइल चोरीचे प्रकार टाळता येणार आहेत. या कॅमेऱ्यांचा एक ॲक्सेस पोलिस प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिला जाणार आहे, तसेच गर्दीची ठिकाणे लक्षात येऊन त्याचे तातडीने नियंत्रण करणे, उपाययोजना करणे सहजशक्य होणार आहे. त्यासाठीचे मॉडेल भोपाळ आयआयटीने देवस्थान समितीला सादर केले आहे.महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतील देवता असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराला नवरात्रौत्सवात २५ लाखांवर भाविक भेट देतात. या काळात दिवसाला सव्वा ते दीड लाख भाविकांची नोंद होते. एवढ्या मोठ्या गर्दीत अनेकदा महिलांच्या पर्स चोरीला जाणे, पर्समधील पैसे चोरणे, दागिने चोरणे, पुरुषांचे पाकीट मारणे, असे प्रकार गुन्हेगार टोळीकडून केले जातात. विशेष म्हणजे यात महिलांचाही सहभाग असतो. यापूर्वी अनेक वेळा देवस्थान समितीच्या सीसीटीव्ही नियंत्रण विभागाने असे चोर पकडून पोलिसांच्या हवाली केले आहेत.
वाचा - कोल्हापूरचा शाही दसरा राज्याच्या प्रमुख महोत्सवांत, जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
आता या सीसीटीव्हींनाच एआय तंत्रज्ञान बसवण्यात येणार असून, त्यात आधीच गुन्हेगारांचे चेहरे फीड केले जातील. हे गुन्हेगार मंदिर आवारात दिसताच त्याचे नोटिफिकेशन नियंत्रण कक्षाला मिळेल. त्यामुळे चोरांना लगेच पकडता येणार आहे. यासाठीचे मॉडेल भोपाळ आयआयटीने देवस्थान समितीला सादर केले आहे. पुढील काही दिवसांत त्यावर कार्यवाही केली जाईल.
अंबाबाई मंदिर व बाह्य परिसरात सध्या ९६ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आणखी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या सर्वच कॅमेऱ्यांना एआय तंत्रज्ञानाचा ॲक्सेस देण्याची मागणी देवस्थान समितीने केली आहे.
एआयचे फायदे
- चोरांना लगेच पकडणे सहज शक्य.
- गर्दीची ठिकाणे ठरवणे व गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी मदत.
- भाविकांच्या रांगा कशामुळे रेंगाळतात, हे लक्षात येणे.