एअर इंडिया, आरसीएफ विजयी
By Admin | Updated: April 18, 2015 00:29 IST2015-04-18T00:27:26+5:302015-04-18T00:29:30+5:30
--व्हीआयपी चषक क्रिकेट

एअर इंडिया, आरसीएफ विजयी
कोल्हापूर : एअर इंडिया, मुंबई संघाने मयूर स्पोर्टस संघाचा ९ गडी राखून, तर दुसऱ्या सामन्यात आरसीएफ संघाने हुंडेकरी स्पोर्टस्चा ४० धावांनी पराभव करीत व्हीआयपी चषक क्रिकेट स्पर्धेची पुढील फेरी गाठली.
कागल येथील शाहू मैदान येथे शुक्रवारी एअर इंडिया, मुंबई व मयूर स्पोर्टस् यांच्यात सामना झाला. नाणेफेक जिंकून मयूर संघाने प्रथम फलंदाजी करीत २५.३ षटकांत सर्वबाद १०१ धावा केल्या. यामध्ये रोहित पाटीलने १६, सूरज जाधवने ११, तर बाकी खेळाडूंना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. एअर इंडियाकडून अंकुश जयस्वालने ६ बळी घेतले, तर त्यास एस. मुल्लाणी याने २ बळी घेत मोलाची साथ दिली.
उत्तरादाखल खेळताना फलंदाजीस आलेल्या एअर इंडिया संघाने १०१ धावांचे आव्हान केवळ ११.१ षटकांत १ बाद १०३ धावा करीत सहज पार केले. यात सलमान अहमदने नाबाद ४२ व रुद्रा दांडेने ३३ धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केले.
दुसरा सामना शास्त्रीनगर मैदानावर आरसीएफ, मुंबई व हुंडेकरी स्पोर्टस् यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना आरसीएफ संघाने ४० षटकांत ७ बाद २६० धावांचे आव्हान हुंडेकरी संघासमोर ठेवले. यात संतोष उपाध्ये ५२, सुनील चावरी ४९, शिवम दुबे ६१, अंकुर सिंगने ७ चेंडंूत नाबाद २७ धावांचा पाऊस पाडला. हुंडेकरी संघाकडून नासीर मोमीनने ४, तर अजय शितोळेने २ बळी घेतले.
उत्तरादाखल खेळताना फलंदाजीस आलेल्या हुंडेकरी संघाचा डाव १७.४ षटकांत सर्वबाद २२० धावांत आटपला. यात अझीम काजीने ५८ व नौशाद शेख याने ५३, अतुल विटकरने ३७, नासिर मोमीनने २५ धावा करीत एकाकी झुंज दिली. मात्र, आरसीएफच्या अंकुर सिंग, वीरेंद्र कांबळी, तरांजित सिंग धिल्लॉँन यांच्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. अंकुर सिंगने ५ बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.