कृषिपंप वीज जोडणीविना
By Admin | Updated: December 10, 2014 23:52 IST2014-12-10T22:26:31+5:302014-12-10T23:52:21+5:30
रत्नागिरी पंचायत समिती सभा : महावितरण अधिकाऱ्यांबाबत नाराजी

कृषिपंप वीज जोडणीविना
रत्नागिरी : शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषी पंपांच्या अनेक कनेक्शनची अजूनही जोडणी केलेली नसल्याने ती तत्काळ करण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना देत सभापतींसह सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली़
रत्नागिरी पंचायत समितीची आजची सभा सभापती प्रकाश साळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ या सभेत मँगोनेटच्या माध्यमातून निर्यातीसाठी आंबा बागायतदारांनी १५ डिसेंबरपर्यंत नोंदणी करावयाची आहे़ शेतकऱ्यांसाठी कौशल्यावर आधारित तीन शेतीशाळांमध्ये उपक्रम घेण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभेत सांगितले़ आंबा नुकसान भरपाईसाठी ८ कोटी रुपयांचे अनुदान आले होते़ त्यापैकी ६ कोटी वाटप करण्यात आले असून, उर्वरित २ कोटी रुपये रक्कम पडून आहे़ ती घेऊन जाण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले़
अंगणवाडी सेविकेच्या भरतीसाठी २१ ते ३५ वर्षे वयोमर्यादा होती़ मात्र, आता त्यामध्ये शासनाने बदल केला असून, २१ ते ३० वर्षे वयोमर्यादा करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले़
महावितरणच्या कामाबाबत आजच्या सभेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली़ मुख्यमंत्री योजनेतून शेतकऱ्यांना कृषी पंपाचे कनेक्शन देणे आवश्यक आहे़ मात्र, महावितरणकडून सन २०११-१२ या वर्षातील लाभार्थींनाही अजून वीज कनेक्शन देण्यात आली नसल्याचे सभापती साळवी यांनी निदर्शनास आणले़ त्यानंतर त्यांनी महावितरणच्या कार्यपध्दतीबाबत नाराजी व्यक्त करुन ताबडतोब कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिली़ यावेळी माजी सभापती स्वप्नाली सावंत यांनीही अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते़
निमशिक्षकांमुळे तालुक्यातील ६ शून्य शिक्षकी शाळांमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या आहेत़ मात्र, अजूनही तालुक्यामध्ये ६ शून्य शिक्षकी शाळा आहेत़ तेथे लवकरच शिक्षण विभागाकडून ही पदे भरण्यात येणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी पंचायत समिती सभागृहात स्पष्ट केले़
या सभेला सभापती प्रकाश साळवी, उपसभापती योगेश पाटील, सदस्य मंगेश साळवी, नदीम सोलकर, मनोज हळदणकर, महेश म्हाप, सदस्या अनुष्का खेडेकर, स्वप्नाली सावंत, फातिमा होडेकर, स्नेहगंधा साळुंखे, दाक्षायिणी शिवगण व अन्य उपस्थित होते़ (शहर वार्ताहर)
विविध प्रश्नांवर चर्चा....
आंबा नुकसानीचे २ कोटी पडून.
माजी सभापतींनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेतले फैलावर.
मँगोनेटच्या माध्यमातून निर्यातीसाठी आंबा बागायतदारांनी १५ डिसेंबरपर्यंत नोंदणी करणे आवश्यक.
अंगणवाडीसेविकेच्या भरतीसाठी २१ ते ३५ वर्षे वयोमर्यादेत बदल.
महावितरणकडून सन २०११-१२ या वर्षातील लाभार्थींनाही अजून वीज कनेक्शन देण्यात आली नसल्याची माहिती.