कृषिक्रांतीचे शिलेदार
By Admin | Updated: June 23, 2015 00:16 IST2015-06-23T00:16:21+5:302015-06-23T00:16:21+5:30
फलोद्यानशास्त्राचे जनक

कृषिक्रांतीचे शिलेदार
वनस्पतीपासून मिळणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये वनस्पतींचे सर्व घटक अन्न म्हणून स्वीकारले गेले आहेत. गाजर, बीट, कंदमुळे ही मुळे जशी आहारात वापरली जातात, तशीच पाने हीदेखील अन्न म्हणून वापरली जातात. तृणधान्य ही तर प्रमुख अन्नघटक बनली आहेत. विविध जीवनसत्वे, क्षार यासाठी फळांचा वापर मानवी संस्कृतीचा जेव्हापासूनचा इतिहास माहिती आहे तेव्हापासून दिसून येतो. शबरीची बोरे हे रामायणातील महत्त्वाचे प्रकरण आहे. फळांचे उत्पादन वाढावे यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने फळबागांची निर्मिती करणारे आणि भारतात फलोद्यानशास्त्र विकसित करणारे असे फलोद्यानशास्त्राचे जनक म्हणजे डॉ. एम. एच. मरिगौडा.
डॉ. मरिगौडा यांचा जन्म ८ आॅगस्ट १९१६ रोजी म्हैसूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण म्हैसूर येथे झाले. त्यांनी लखनौ विद्यापीठातून वनस्पतीशास्त्राची एम.एस्सी. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९४२ मध्ये सहाय्यक त्यांची उद्यान अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. शासकीय उद्यानाचे अधीक्षक रावबहाद्दूर एच. सी. जावराया यांच्या देखरेखीखाली ते लालबाग उद्यानाचे काम पाहू लागले. त्यांच्या कामातील प्रगती पाहून १९४७ मध्ये फलोद्यानाचे सखोल प्रशिक्षण मिळावे म्हणून त्यांना रॉयल बोटॅनिकल गार्डन, इंग्लंड येथे पाठविले. येथे सहा महिने उद्यानांचा अभ्यास करून ते अमेरिकेला गेले. तेथे प्रसिद्ध हॉर्वर्ड विद्यापीठात पीएच.डी. प्राप्त केली. त्यानंतर लगेच १९५१ मध्ये ते भारतात परतले. परत येताच त्यांना पदोन्नत करून उद्यान उपअधीक्षकाचे पद दिले आणि थोड्याच दिवसांत ते लालबाग उद्यानाचे अधीक्षक बनले. १९६३ मध्ये त्यांना फलोद्यान विभागाचे म्हैसूर राज्याचे संचालक केले. म्हैसूर राज्यात अत्यंत दुर्लक्षित असणाऱ्या फलोद्यान क्षेत्राचा त्यांनी मोठा प्रसार केला. लोकांना फळबागा लावण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यापूर्वी कृषी विभागांतर्गत फलोद्यान विभाग होता. मात्र, मारिगौडा यांनी विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवून फलोद्यान विभागाची स्वतंत्र निर्मिती केली. त्यांनी फलोद्यानासाठी चतु:सूत्री तयार केली. पूर्ण राज्यात ३८० ठिकाणी फळबागा आणि रोपवाटिका तयार केल्या. या रोपवाटिका नवीन वाणांची निर्मिती करणारे केंद्र होत्या. फळांच्या लागवडीची आणि संगोपनाची नवी तंत्रे निर्मिती केंद्रे बनली. विशेषत: नारळाच्या नव्या वाणांची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली. बेल्लार आणि कन्नमंगल या केंद्रांनी केलेल्या कायार्मुळे डॉ. मारिगौडा यांचे नाव भारतभर झाले. फळबागांच्या प्रयोगासाठी मारिगौडा यांनी रोपवाटिकाबरोबर प्लॅट प्रोटेक्शन, लॅबोरेटरी, मृद संधारण प्रयोगशाळा आणि बीज चाचणी प्रयोगशाळांची लालबाग उद्यानात स्थापना केली.
फळांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यावर त्यांचे जतन करणे आणि ग्राहकापर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे असते. फळातून अनावश्यक पाणी काढून टाकण्याचे तंत्र आणि यंत्र विकसित केले. त्यांनी विविध वाण स्वत: तयार केले आणि जनतेपर्यंत पोहोचवले. जिरायती शेतीत फळबागा लावण्यासाठी त्यांनी जनतेला प्रोत्साहित केले. निव्वळ पावसाच्या पाण्यावर फळबागा निर्माण करून आदर्श उभा केला. शेतकऱ्यांनीही अनुकरण केले.
कोणत्या फळबागेत कोणते आंतरपीक घ्यावे हे स्वत: प्रयोग करून त्यांनी समाजापर्यंत पोहोचवले. त्यांच्या या स्वकामगिरीमुळे कर्नाटक फळांचे राज्य बनले. भरपूर उत्पादन देणारे मलिका आंबा वाण त्यांच्याच काळात प्रसिद्ध झाले. १९७६ ला ते सेवानिवृत्त झाले आणि १९९२ ला निधन होईपर्यंत बंगलोर येथे वास्तव्य केले. मात्र, अखेरच्या श्वासापर्यंत ग्राम विकास आणि फलोद्यान क्षेत्रात ते कार्यरत राहिले.
- डॉ. व्ही. एन. शिंदे, उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर