आंदोलनाचा पुन्हा भडका उडणार

By Admin | Updated: December 6, 2014 00:51 IST2014-12-06T00:51:23+5:302014-12-06T00:51:41+5:30

कृती समितीची उद्या बैठक : हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारला घेरणा

The agitation will start again | आंदोलनाचा पुन्हा भडका उडणार

आंदोलनाचा पुन्हा भडका उडणार

कोल्हापूर : भविष्यातील टोलविरोधात लढा व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीतर्फे रविवारी (दि. ७) बैठकीचे आयोजन केले आहे. मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात दुपारी ३.३० वाजता होणाऱ्या बैठकीला ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील उपस्थित राहणार आहेत. बैठक ीसाठी सर्व राजकीय पक्ष, तालीम संस्था, व्यापारी व व्यावसायिक संस्था, तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत टोल आंदोलनाचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे.
शहरातील टोलवसुलीविरोधात गेली चार वर्षे कृती समितीचा लढा सुरू आहे. कृती समितीने टोलविरोधात तीन वेळा महामोर्चा व ‘कोल्हापूर बंद’ची हाकही दिली. अनेक मार्गांनी आंदोलन करून राज्य शासनाकडे टोलविरोधात दाद मागण्याचा प्रयत्न केला. न्यायिक स्तरावरही टोलचा लढा सुरू आहे. मात्र, मागील महिन्यात टोलविरोधातील सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळत टोलवसुलीचा मार्ग मोकळा केला. कृती समितीने आता पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरकरांना टोलमुक्तीचे आश्वासन दिले. मात्र, शासनस्तरावर टोलमुक्तीसाठी ठोस काहीही हालचाल झाली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कृती समितीने टोलप्रश्नी चर्चा करण्यासाठी वेळ मागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयातून भेटीची वेळ अद्याप मिळालेली नाही. आता नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर टोलविरोधी आंदोलनाचा धुरळा पुन्हा उडणार आहे. नवीन सरकारला घेरण्यासाठी, आंदोलनाची रणनीती निश्चित करण्यासाठी या बैठकीचे नियोजन करण्यात आल्याचे कृती समितीने म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The agitation will start again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.