मटक्याचा अड्डामालक बनला ‘एजंट’
By Admin | Updated: November 10, 2014 00:44 IST2014-11-10T00:31:49+5:302014-11-10T00:44:17+5:30
जिवलग दोस्त माझे मालक : विजय पाटील याचा गोपनीय जबाब

मटक्याचा अड्डामालक बनला ‘एजंट’
एकनाथ पाटील - कोल्हापूर --पोलीस खात्याची नोकरी अर्ध्यावर सोडून, खात्यातील निवडक सहकाऱ्यांना हाताशी धरून जिल्ह्यात मटका व्यवसाय फोफावून करोडो रुपये जमा करणारा मटकाअड्डा मालक विजय पाटील स्वत: एजंट असल्याची बतावणी पोलिसांना करीत आहे.
व्यवसायात मदत करणाऱ्या अनेक पोलिसांना त्याने देशोधडीला लावलेच; परंतु आता जुन्या दोस्तांची नावे घेऊन त्यांनाही रस्त्यावर आणण्याचा तो प्रयत्न करीत आहे. जुना राजवाडा पोलिसांना दिलेल्या गोपनीय जबाबामध्ये त्याने दोस्त उमेश खंडेराव पाटील (रा. निचितेनगर) व जनार्दन दगडू जाधव (रा. न्यू पॅलेस) हे आपले मटकाअड्डा मालक असल्याचे सांगून पोलिसांची झोप उडविली. स्वत:च्या बचावासाठी सरड्यांसारखा रंग बदलणारा ‘विजय’ कधी कोणाचा घात करील, हे सांगता येत नसल्याने पोलीसही त्याच्यापासून चार हात लांब राहूनच तपास करीत आहेत.
तो पूर्वी पोलीस खात्यामध्ये होता; त्यामुळे त्याला कायदा चांगलाच माहीत! झटपट पैसे कमाविण्यासाठी खाकी वर्दीला त्याने अर्ध्यावरच रामराम ठोकला आणि अवैध व्यवसायात पदार्पण केले. त्या काळी मटका म्हणजे लोकांना माहीत नव्हते; परंतु ‘झटपट श्रीमंतीचा मार्ग’ अशी जाहिरात करून त्याने जिल्ह्यात मटका पसरवला. गुन्हेगारीशी संबंधित तरुणांना त्याने एजंट बनविले. कारवाई रोखण्यासाठी पोलिसांना हाताशी धरले. हप्तेगिरी करत त्याने करोडो रुपयांची माया जमविली. पाच-सहा वर्षांपूर्वी व्यवसायात भागीदार असलेल्या पोलिसांशी त्याचे बिनसले आणि कधीही न होणाऱ्या मटक्यावर कारवाई होऊ लागली. आपलेच खाऊन आपल्याच घराचे वासे मोजणाऱ्या पोलिसांचा बदला घेण्यासाठी त्याने थेट करवीरच्या चौघा पोलिसांची हप्ते घेतानाची चित्रफीत बनविली आणि त्यातून ते पोलीस निलंबित झाले. मटक्याचे नेटवर्क सांभाळणारा व ‘विजयचा उजवा हात’ म्हणून ओळखला जाणारा पोलीस फिरोज मुल्ला याला तर कायमचे घरी बसावे लागले.
जिल्ह्याच्या पोलीस खात्यात अधीक्षकांपासून ते निरीक्षकांपर्यंत सारेच नवीन आल्याने आपण मटका व्यवसाय बंद केल्याचा कांगावा करीत मटका व्यवसाय करणाऱ्या अनेकांच्या नावांचे निवेदन त्याने पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना दिले. पोलीस आपणाला विनाकारण लक्ष्य करीत असल्याचा आरोपही त्याने केला. पोलिसांबरोबर प्रसारमाध्यमांचीही त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. छुप्या मार्गाने मंगळवार पेठेत आॅनलाईन लॉटरी सेंटरची शक्कल लढवीत मटका घेण्यास सुरुवात केली आणि त्याचा हा डाव राजवाडा पोलिसांनी हाणून पाडला.
दिवस भरले...
मटक्याचे जाळे पसरविणाऱ्या विजय पाटील याला ‘मोक्का’ लावण्याच्या पोलिसांच्या हालचाली सुरू आहेत. राजवाडा पोलीस त्याच्या गुन्ह्यांची फाईल बनविण्यात व्यस्त आहेत. ही फाईल ते पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांच्या सहीने विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार शर्मा यांच्याकडे काही दिवसांत पाठविणार असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे ‘मटका मालक ते चक्क एजंट’ असा प्रवास केलेल्या विजयचे दिवस आता भरले असल्याचे पोलीस सांगत आहेत.