सहीविनाच सदस्य निवडीचा अजेंडा
By Admin | Updated: May 12, 2016 00:52 IST2016-05-11T23:33:02+5:302016-05-12T00:52:41+5:30
महापालिका सभा : विषयांच्या आदेशाबाबत स्पष्टता नाही

सहीविनाच सदस्य निवडीचा अजेंडा
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या स्थायी समितीवरील दोन तर परिवहन समिती व महिला बालकल्याण समितीच्या प्रत्येक एक सदस्याची निवड शुक्रवारी (दि. २०) होणार आहे. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचा अजेंडा बुधवारी प्रसिद्ध झाला. त्यामध्ये सदस्य निवडीचे विषय लावण्यात आले आहेत. एरव्ही महापौरांच्या आदेशाने सभा बोलविली जाते, परंतु शुक्रवारी होणाऱ्या (दि.२० मे) सभेच्या अजेंड्यावर कोणाचीही सही नसल्याने ही सभा कोणाच्या आदेशाने बोलाविली हे स्पष्ट होत नाही.
प्रत्येक महिन्याची सभा ही महापौरांच्या आदेशाने व त्यांच्या सहीने नगरसचिव बोलवत असतात; परंतु सध्या महापौरपद रिक्त आहे. त्यामुळे २० मे रोजी होणाऱ्या सभेच्या अजेंड्यावर महापौर म्हणून कोणाचीही सही नाही. विशेष म्हणजे नगरसचिव यांचीही सही नाही. मग ही सभा कोणी बोलाविली असा प्रश्न अनेक नगरसेवकांना पडलेला आहे.
या सभेत विषय क्रमांक २, ३ व ४ नुसार स्थायी समिती, परिवहन व महिला बालकल्याण समितीवरील रिक्त झालेल्या सदस्यांची निवड केली जाणार आहे. नीलेश देसाई व दीपा मगदूम यांचे नगरसेवकपद रद्द झाल्यामुळे त्यांच्या जागी स्थायी समितीवर दोन सदस्य निवडायचे आहेत. सचिन पाटील हे परिवहन समितीवर होते, वृषाली कदम या महिला बालकल्याण समितीवर होत्या. त्यांच्या जागीही नवे सदस्य निवडण्यात येणार आहेत. नगरसेवकपद रद्द झाल्यामुळे जी जागा रद्द झाली ती यापूर्वी ज्या पक्षाकडे होती त्या पक्षाचेचे सदस्य निवडले जातील तसेच त्यांच्या पक्षाच्या गटनेत्याने नावे नामनिर्देशित करायची आहेत.
एकीकडे अपात्र नगरसेवक आपल्याविरोधातील कारवाईला उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविण्याच्या प्रयत्नात असतानाच दुसरीकडे तातडीने महानगरपालिका प्रशासनाने समिती सदस्य निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे या निवडी होणार की नाही याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
महिला बालकल्याण समिती सभापती निवड मंगळवारी
कोल्हापूर : जातीच्या अवैध दाखल्यामुळे वृषाली कदम यांना पायउतार व्हावे लागल्यामुळे महिला व बालकल्याण समितीच्या रिक्त झालेल्या सभापतिपदाची निवड मंगळवारी (दि. १७) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. मनपा नगरसचिव कार्यालयाने बुधवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. विभागीय जातपडताळणीच्या निकालाविरोधात कदम यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी व्हायची आहे. तोपर्यंत महानगरपालिका प्रशासनाने नवीन सभापतींची निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयाने नवीन सभापती निवडीचा कार्यक्रम निश्चित केला. त्यानुसार नवीन सभापती निवडीसाठी महिला व बालकल्याण समितीची सभा मंगळवारी (दि. १७) होईल. तत्पूर्वी शुक्रवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच यावेळेत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत.
चिठ्ठी टाकून निर्णय
महिला बालकल्याण समितीत काँग्रेस-राष्ट्रवादी व भाजप-ताराराणी आघाडीचे वृषाली कदम यांचे नगरसेवकपद रद्द झाल्यामुळे संख्याबळ समान ४-४ असे झाले आहे. त्यामुळे मंगळवारी सभापती निवडणुकीत समान मतदार होणार आहे. त्यावेळी चिठ्ठी टाकून सभापती निवडीचा निर्णय घ्यावा लागेल.