ग्रामस्वच्छता अभियानाला पुन्हा वेग
By Admin | Updated: July 5, 2016 00:27 IST2016-07-04T22:48:22+5:302016-07-05T00:27:57+5:30
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान : निकषांत बदल; पुरस्कार बक्षिसांच्या रकमेतही मोठी वाढ

ग्रामस्वच्छता अभियानाला पुन्हा वेग
प्रकाश पाटील--कोपार्डे --पाच महिन्यांपूर्वी स्थगित करण्यात आलेले संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याबाबतच्या सुधारित मार्गदर्शक सूचना जिल्हा परिषदांना दिल्या असून नव्या निकषांप्रमाणे गटाऐवजी थेट तालुका पातळीवर ग्रामपंचायतींची तपासणी होणार आहे. शंभर टक्के हागणदारीमुक्त असणाऱ्या ग्रामपंचायतींना प्राधान्य दिले जाणार आहे. बक्षिसांच्या रकमेतही मोठी वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीचा अभियानात आता सहभाग महत्त्वाचा आहे, असे जिल्हा परिषदांना निर्देश देण्यात आले आहेत.
ग्रामीण स्वच्छता हा मूळ उद्देश घेऊन २००१ पासून राज्यात तत्कालीन ग्रामविकासमंत्री आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले. तेव्हापासून ग्रामपंचायतींसाठी संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा घेतली जात आहे. २००३ पासून स्वच्छतेशी व ग्राम विकासाशी निगडित भरीव काम करणाऱ्या जिल्हा, तालुका, विभाग व राज्य पातळीवरही बक्षिसे देण्याचा उपक्रम सुरू केला. राज्यातील अनेक गावांनी लोकसहभागातून याला चळवळीचे स्वरूप देऊन लाखो रुपयांची बक्षिसे मिळविली. राज्यातील अनेक तालुके, ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या.
महाराष्ट्रातील हा उपक्रम बघून केंद्र सरकारने ‘निर्मल भारत’ हा उपक्रम सुरू केला. त्यातून चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव केला जात असे. अलीकडे केंद्र सरकारने नावात बदल करून ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू केले. मात्र, राज्यात सुरू असलेले ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान’ स्थगित ठेवण्याचा निर्णय घेऊन ६ फेब्रुवारी २०१६ ला सर्व जिल्हा परिषदांना शासनाने कळविले होते. तेव्हापासून या अभियानातील सर्व उपक्रम जिल्हा परिषदेने बंद केले होते. मात्र, शासनाने त्यात मोठा बदल करीत हे अभियान पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन आॅक्टोबरपासून अभियान प्रारंभ
राज्यात २० हजार ८०० ग्रामपंचायती असून, त्या २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. दरवर्षी २ आॅक्टोबरपासून अभियान औपचारिकरीत्या सुरू होणार असले तरी १ मेपासून याची पूर्वतयारी सुरू असेल. त्यानंतर महिनाभर जनजागृतीचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जाणार आहेत. स्थगित केलेले अभियान पुन्हा सुरू केल्याने ग्रामीण भागात स्वच्छतेचे पुन्हा वारे वाहू लागणार आहे.