साडेतीनशे वर्षांनंतर दृष्टीस पडला सतीचा खांब
By Admin | Updated: May 22, 2015 00:09 IST2015-05-21T23:45:19+5:302015-05-22T00:09:33+5:30
भेडसगावातील भवानी तलाव : ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांची वर्दळ

साडेतीनशे वर्षांनंतर दृष्टीस पडला सतीचा खांब
बाबासाहेब कदम - वारणा कापशी -भेडसगाव (ता. शाहूवाडी) येथील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या भवानी तलावातील गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान, गाळ काढताना तलावातील सतीचा खांब उघडा झाल्याने गावातील पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या चिमुकल्या बाळासह स्वत:चे बलिदान देणाऱ्या लक्ष्मीबाई पाटील या पाटलांच्या सुनेच्या इतिहासाला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.
सुमारे ३५० वर्षांनंतर उघडा झालेला तलावाच्या मध्यभागी असणारा दहा फूट उंचीचा खांब आणि तलावातील पाणी सोडण्यासाठी दूरगामी विचार करून बांधलेला चेंबर पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांची वर्दळ वाढत आहे.
सुमारे ३५० वर्षांपूर्वी भेडसगाव येथील ग्रामस्थांना दुष्काळी स्थितीमुळे पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला. त्यामुळे चिमाजी पाटील यांनी ग्रामदैवत नीलकंठेश्वराच्या समोर गावसभा बोलावली. यावेळी श्रमदानातून सुमारे पाच एकरात तलाव खोदण्याचे ठरले. तलाव खोदला परंतु, पाण्याचा प्रश्न मात्र सुटला नाही. मात्र, ग्रामदैवताने दिलेल्या दृष्टांतानुसार गावातील सामान्य कुटुंबातील स्त्रीवर अन्याय होऊ नये म्हणून लक्ष्मीबाई पाटील या पाटलांच्या सुनेने आपल्या चिमुकल्यासह सती जाण्याचा निर्णय घेतला होता.
तलावाच्या निर्मितीनंतर केवळ दोनवेळा या तलावातील गाळ काढण्याचा प्रयत्न नियोजनाअभावी पूर्ण झाला नाही. दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील यांनी तेराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून सुमारे दहा लाखांचा निधी मंजूर करून दोन महिन्यांपासून तलावातील गाळ काढण्याचे काम चालू ठेवले आहे. गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना तलावाच्या मध्यभागी असणारा दगडी चबुतऱ्याच्या बांधकामातील सुमारे दहा फूट उंचीचा लाकडी खांब मात्र आजदेखील सुस्थितीत आहे. पाटलांच्या सुनेचे बलिदानाचे प्रतीक म्हणून असलेला हा सतीचा खांब पुन्हा चर्चेत आला आहे. ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांनी १९९० मध्ये याच विषयावर ‘अंगाई’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.
वैशिष्ट्यपूर्ण दगडी चेंबर
तलावातील संपूर्ण पाणी बाहेर काढण्यासाठी २७ छिद्रे व १२ फूट उंची असलेला दगडी बांधकामाचा वैशिष्ट्यपूर्ण चेंबर येथे पहावयास मिळतो. गाळ काढताना उघडा झालेला हा दगडी चेंबर आणि सतीचा खांब पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांची वर्दळ मात्र वाढत आहे.
तलावाच्या मध्यभागी असलेल्या सतीच्या खांबामुळे भेडसगाव येथील भवानी तलावाचे ऐतिहासिक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. नियोजनबद्ध प्रयत्नामुळे तलावातील गाळ काढण्याचे कठीण काम पूर्ण झाले आहे. भविष्यात या तलावाला गतवैभव प्राप्त होणार आहे.
- चंद्रकुमार नलगे, ज्येष्ठ साहित्यिक