कोल्हापूर : वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनंतर पाकाळणी या मंदिर स्वच्छतेनिमित्त सोमवारी (दि. २८) पहाटे ४ ते दुपारी ३ यावेळेत मंदिर दर्शनासाठी बंद राहील. तरी भाविकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केले आहे.जोतिबा देवाची वर्षातील सर्वात मोठी चैत्र यात्रा १२ तारखेला पार पडली. त्यानंतर देखील गेले १५ दिवस देवाच्या दर्शनासाठी भाविकांची जत्रेसारखी गर्दी होत आहे. यात्रेनंतर दरवर्षी मंदिर स्वच्छतेचा पाकाळणी हा विधी केला जातो. यात्रेमुळे गुलालाने रंगलेले मंदिर, शिखर व मंदिराचा संपूर्ण परिसर पाण्याने स्वच्छ धुतला जातो. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, मंदिराचे पुजारी, गुरव व व ठराविक भाविकांच्या सहभागातून ही स्वच्छता केली जाते. त्यानुसार सोमवारी मंदिर स्वच्छ केले जाणार असून त्यामुळे पहाटे ४ ते दुपारी ३ यावेळेत मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहिल. त्यानंतर दर्शन पूर्ववत सुरू होईल.
Kolhapur: पाकाळणीनिमित्त जोतिबा मंदिर दर्शनासाठी बंद राहणार, भाविकांना सहकार्याचे आवाहन
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: April 26, 2025 15:20 IST