निवृत्तीनंतर ८७ व्या वर्षी एलएल. बीचे स्वप्न पूर्ण
By Admin | Updated: August 20, 2014 00:55 IST2014-08-19T23:24:24+5:302014-08-20T00:55:58+5:30
जिद्दी आजोबांचे नाव आहे - गोविंदराव ऊर्फ बाबूराव परुळेकर!

निवृत्तीनंतर ८७ व्या वर्षी एलएल. बीचे स्वप्न पूर्ण
गोविंद परुळेकर; निवृत्तीनंतर केले स्वप्न पूर्ण
कोल्हापूर : ‘डोळ्यांना कमी दिसतंय, कंबर दुखतेय, पायांत ताकद नाही, अंग थरथरतंय, अंगात अशक्तपणा आहे, मधुमेह आहे,’ असं म्हणायचं खरं तर त्यांचं वय; परंतु यातील कोणतंही दुखणं त्यांना नाही. घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे ऐन तारुण्यात वकील होता आले नाही, याचं शल्य मात्र आयुष्यभर त्यांच्या मनाला बोचत राहिलं.
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी वकील होण्याचा मनात घाट घातला आणि आश्चर्य काय तर तब्बल ८७व्या वर्षी त्यांनी मनातील जिद्द पूर्ण केली. एलएल.बी.ची परीक्षा ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. या जिद्दी आजोबांचे नाव आहे - गोविंदराव ऊर्फ बाबूराव परुळेकर!
मूळचे आजरा येथील रहिवासी असलेल्या गोविंदराव परुळेकर यांना घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ मॅट्रिकपर्यंतच शिक्षण घेता आले. मॅट्रिक्युलेट झाल्यानंतर त्यांना न्यायालयात नोकरी मिळाली. नोकरी करीत-करीत त्यांनी सुपरिंटेंडेंट पदापर्यंत मजल मारली. ३६ वर्षांच्या सेवेनंतर १९८६ मध्ये गोविंदराव सेवानिवृत्त झाले. दरम्यान, त्यांची मुले, नातवंडे उच्चशिक्षित झाली. वकील होण्याचे स्वप्न आणि त्यातच घराण्यात केवळ आपणच कमी शिकलेलो याचे शल्य गोविंदरावांना बोचायला लागले.
गोविंदरावांनी ७८व्या वर्षी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून इंग्रजी, समाजशास्त्र व मानसशास्त्र हे विषय घेऊन बी. ए.ची पदवी संपादन केली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील लॉ कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तरुण विद्यार्थ्यांच्या वर्गात बसून दरवर्षी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांना मिळाला. विशेष म्हणजे महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात ते सोमवार ते शनिवार कुडाळ येथे राहून शनिवारी दुपारी अॅक्टिव्हा गाडी स्वत: चालवीत आजरा येथे गावी येत असत. आपल्या गावी निगराणी ठेवून पुन्हा रविवारी सायंकाळी ते कुडाळला जात.