लॉकडाऊन संपल्यानंतर मराठा आरक्षणाच्या लढ्याची पुन्हा सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:25 IST2021-05-19T04:25:05+5:302021-05-19T04:25:05+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर मराठा आरक्षणासाठीच्या ...

After the end of the lockdown, the fight for Maratha reservation resumed | लॉकडाऊन संपल्यानंतर मराठा आरक्षणाच्या लढ्याची पुन्हा सुरूवात

लॉकडाऊन संपल्यानंतर मराठा आरक्षणाच्या लढ्याची पुन्हा सुरूवात

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याची पुन्हा सुरूवात करण्याचा निर्णय कोल्हापुरातील मराठा समाजाच्या विविध संघटनांनी घेतला आहे.

आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाप्रमाणे सवलत द्यावी. सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सक्षम करावे आदी विविध मागण्या सकल मराठा समाजाने राज्य सरकारकडे केल्या आहेत. त्याबाबत सरकारने भूमिका जाहीर केल्यानंतर आणि लॉकडाऊन संपल्यानंतर आरक्षणासाठीच्या लढ्याची सुरुवात केली जाईल, असे कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे समन्वयक इंद्रजित सावंत यांनी मंगळवारी सांगितले. आरक्षणासह अन्य मागण्या सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाने केल्या आहेत. त्याबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर आंदोलन सुरू केले जाणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक सचिन तोडकर यांनी सांगितले. दरम्यान, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेबाबतच्या (सारथी) विविध मागण्यांसाठी या संस्थेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ४० संशोधक विद्यार्थ्यांनी सोमवारी (दि. १७) आपल्या घरी लाक्षणिक उपोषण केले. ‘सारथी’साठी निवड झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांना देण्यात येणारी फेलोशिप ही विद्यापीठ अनुदान आयोगाप्रमाणे (यूजीसी) विद्यापीठातील प्रवेश दिनांकापासून द्यावी. गेल्या वर्षीचा आकस्मिक खर्च आणि वार्षिक घरभाडे भत्ता मिळावा, या मागण्यांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातूनच आम्ही लाक्षणिक उपोषण केले. ‘सारथी’चे राज्यभरातील संशोधक विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले. लॉकडाऊन संपल्यानंतर पुणे येथील ‘सारथी’च्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण, आंदोलन करण्यात येणार आहेत. मागण्या आणि आंदोलनाचा इशारा असलेले निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ऑनलाईन पाठविण्यात आले असल्याची माहिती कोल्हापुरातील संशोधक विद्यार्थी मयूर येलमार आणि अरविंद पाटील यांनी दिली.

चौकट

कोरोनामुळे सध्या आंदोलन स्थगित

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सध्या आम्ही आंदोलन स्थगित केले आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर बैठक घेऊन पुन्हा आंदोलन सुरू केले जाणार असल्याचे सकल मराठा शौर्यपीठाचे समन्वयक प्रसाद जाधव यांनी सांगितले.

Web Title: After the end of the lockdown, the fight for Maratha reservation resumed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.