दिवाळीनंतर पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा
By Admin | Updated: October 16, 2015 00:40 IST2015-10-16T00:20:02+5:302015-10-16T00:40:26+5:30
हसन मुश्रीफ : महापालिकेसाठी ‘कागल’मधील दहा हजार कार्यकर्ते दसऱ्यादिवशी कोल्हापुरात

दिवाळीनंतर पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा
कागल : लोकसभा निवडणुकीपासून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाचा अश्वमेध सुरू आहे. कोल्हापूरची स्वाभिमानी जनता पाठीशी असल्याने मनपा निवडणुकीतही विजयाचा अश्वमेध कायम राहील. कोल्हापूरकर आणि कागलकरांचे ऋणानुबंध जुळलेले आहेत. कागल तालुक्यातील दहा हजार कार्यकर्ते दसऱ्यादिवशी कोल्हापूरकरांची सदिच्छा भेट घेऊन राष्ट्रवादीची भूमिका मांडतील, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. कागल तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवारी येथील शाहू सभागृहात आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. मेळाव्यास शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील, नगराध्यक्षा संगीता गाडेकर, नवीद मुश्रीफ, तालुका संघाचे अध्यक्ष शशिकांत खोत, गणपतराव फराकटे, आदी प्रमुख उपस्थित होते. मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचीच हवा शहरात आहे. म्हणून कागल तालुक्यातील कार्यकर्त्यांनी शहरातील आपले नातेवाईक, मित्र, स्नेही, सामान्य जनतेची भेट घेऊन संवाद साधावा. त्यासाठी दसऱ्याचा दिवस योग्य असून, चांगल्या विचारांचे सोने वाटप करावे. भाजप-सेना युतीचे सरकार गोरगरिबांच्या सर्व योजना बंद करण्याच्या प्रयत्नात आहे. बांधकाम कामगार, निराधार, अपंग, दलित, घरेलू कामगार अशा असंख्य घटकांवर अन्याय करीत आहे. शासनाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी दिवाळीनंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर एक लाख लोकांचा मोर्चा काढू. ‘न भूतो, न भविष्यती’ असा हा मोर्चा
असेल.
यावेळी युवराज पाटील म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला ४० ते ४५ जागा हमखास मिळतील, असे सर्वांच्या लक्षात आलेले आहे. यावेळी डी. डी. चौगुले, भैया माने, शशिकांत खोत यांचीही भाषणे झाली.
लाटण्याने स्वागत करा
मुश्रीफ म्हणाले, निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची चौकशी यापूर्वी राधानगरी-भुदरगड महसूल कर्मचाऱ्यांतर्फे केली. आता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील सांगलीतील अधिकाऱ्यांकडून चौकशी करीत आहेत. त्यांचे स्वागत लाटण्याने केल्याशिवाय राहणार नाहीत.
राजे-मंडलिकांची पोकळी
माजी खासदार सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. आपण त्यांच्या कार्याचा हा वसा पुढे नेऊया. त्यासाठी सहकार्याची भूमिका ठेवूया, असे मुश्रीफ म्हणाले.