कावीळने शाळकरी मुलाच्या मृत्यूनंतर यंत्रणा संतर्क

By Admin | Updated: January 2, 2015 00:57 IST2015-01-02T00:52:24+5:302015-01-02T00:57:41+5:30

शिरढोण येथे वैद्यकीय पथक दाखल

After the death of a school child, Javantra Sankara | कावीळने शाळकरी मुलाच्या मृत्यूनंतर यंत्रणा संतर्क

कावीळने शाळकरी मुलाच्या मृत्यूनंतर यंत्रणा संतर्क

कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथे कावीळच्या साथीने वैभव प्रकाश पाटील याचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एस. दातार, नांदणी प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एस. आर. गुरव यांनी गावाला भेट देऊन दूषित पाणी व साथीच्या आजारांबाबत माहिती घेतली व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
बुधवारी (दि. ३१) सकाळी काविळीच्या आजाराने वैभवचा मृत्यू झाला. पंचगंगा व कृष्णानदीच्या दूषित पाण्यामुळे गावामध्ये रुग्णांची संख्या वाढत असताना ग्रामपंचायत व आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली. तालुका वैद्यकीय अधिकारी दातार यांनी केंद्राचे अधिकारी आरोग्य सेवक यांची बैठक घेऊन दूषित पाण्याबाबत जागृती करणे, घरोघरी भेट देऊन रुग्णांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यासाठी पथकही नेमले आहे. तसेच नदीचे पाणी उकळून पिण्यासाठी गावामध्ये दवंडी देण्याचे आदेश ग्रामपंचायतीला दिले.
यावेळी नांदणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुपरवायझर मानसिंग वडर, आरोग्य सेवक बी. एस. सनदी, ए. बी. घोलप, के. बी. एरंडोले, व्ही. के. शिंदे, पी. पी. मुळे, डी. के. ढाले, एम. एस. घुणके, आदी वैद्यकीय पथकातील कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)



शाळा गहिवरली
वैभव हा कुमार विद्यामंदिरातील पहिलीच्या वर्गामध्ये शिकत होता. शांत स्वभावाचा व हुशार असल्याने शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होता. त्याचा मृत्यू झाल्याने आज, गुरुवारी शाळेत श्रद्धांजलीसाठी उभे राहिले असता शिक्षकांसह अनेक विद्यार्थ्यांना अश्रू आवरता आले नाहीत.

Web Title: After the death of a school child, Javantra Sankara