लिलावानंतर वाळू महागच ?
By Admin | Updated: January 13, 2015 00:16 IST2015-01-12T21:58:35+5:302015-01-13T00:16:06+5:30
किमतीवर नियंत्रणाची गरज : लघुतम किंमतच ग्राहकांच्या मुळावर

लिलावानंतर वाळू महागच ?
संदीप बावचे - शिरोळ -यंदा एका वाळू साठ्याची लघुतम किंमत ३८ लाखांपासून पुढे ठेवण्यात आल्याने एका आवटीसाठी जवळजवळ साठ ते सत्तर लाखांपर्यंत खर्च होणार आहे. त्यामुळे ही वाढलेली रक्कम वाळू विक्रीवर परिणाम करणारी असून वाढविण्यात आलेली लघुतम किंमत ही ग्राहकांच्या मुळावरच बसणार आहे.वाळूचे आगर म्हणून शिरोळ तालुक्याला ओळखले जाते. कृष्णा नदीतून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जातो. अलीकडच्या पाच-सहा वर्षांतील काळापासून वाळू लिलावात मोठा महसूल प्रशासनाला मिळू लागला आहे. दहा लाखांपासून सत्तर लाखांपर्यंत वाळू लिलावाची प्रक्रिया होत होती. दरम्यान, ८० हून अधिक प्रस्ताव खणीकरण विभागाकडे पाठविण्यात आले होते. यातील ५५ वाळू साठ्यांना पर्यावरणाची मंजुरी मिळाली आहे.त्यातच ३८ लाखांपासून एका प्लॉटची लघुतम किंमत ठरविण्यात आली आहे. यामुळे एक वाळू लिलाव साठ लाखांच्या घरात पोहोचणार आहे. पाच हजार रुपये प्रमाणे ब्रासची किंमत झाल्यास
एका ट्रकमागे ग्राहकाला सतरा ते अठरा हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
तीन ठिकाणी लिलाव नाही
ग्रामसभेचा ठराव न आल्याने यंदा कवठेसार, आलास व कनवाडमधील वाळू लिलाव होणार नाहीत. गतवर्षी या ठिकाणचा वाळू लिलाव वादग्रस्त ठरला होता. ग्रामसभेचा ठराव देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न झाले. मात्र, ठेकेदारांना यात यश आले नाही.
वाळू दरवाढीवर नियंत्रण ठेवण्याची गरज
वाळूच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवून वाळूचा मुबलक पुरवठा करावा, या मागणीसाठी इचलकरंजी येथील प्रांत कार्यालयावर लाल बावटा बांधकाम व्यवसाय संघटनेने नुकताच मोर्चा काढला होता.
मात्र, वाळू साठ्यांच्या लघुतम किमतीमुळे ग्राहकांना वाळू चढ्या दरानेच मिळणार आहे. यामुळे महसूल विभागाने याप्रश्नी आतापासूनच लक्ष घालून वाळू किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना राबविण्याची गरज आहे.
वाळू साठ्याची लघुतम किमत, एलबीटी, बॅँक गॅरंटी, अनामत रक्कम, मळी मालकाला द्यावी लागणारी रक्कम, यंत्रसामग्रीचा व वाळू भरण्याचा खर्च या सर्व बाबींचा ताळमेळ वाळू ठेकेदारांना घालावा लागणार आहे. शिवाय नदीपात्रातून नेमकी वाळू किती निघेल, याचा अंदाज नसल्यामुळे वाळूचे दर वाढविण्याशिवाय पर्याय नाही.
- मुस्ताकमंहमद पटेल, वाळू ठेकेदार, औरवाड