अखेर कळसगादे शाळा सुरू
By Admin | Updated: October 16, 2015 22:27 IST2015-10-16T22:11:49+5:302015-10-16T22:27:52+5:30
कळसगादे ग्रामस्थांनी गेल्या तीन तारखेपासून बेमुदत शाळा बंद आंदोलन सुरू केले होते. जोपर्यंत आठवीच्या वर्गाला मान्यता मिळणार नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवणार,

अखेर कळसगादे शाळा सुरू
चंदगड : कळसगादे (ता. चंदगड) येथे आठवीच्या वर्गाला मान्यता न मिळाल्याच्या निषेधार्थ बंद असलेली शाळा शुक्रवारी सुरू झाली. शिक्षण विभागाच्या लेखी आश्वासनानंतर शाळा बंद आंदोलन मागे घेऊन शुक्रवारी शाळा सुरू करण्यात आली.
आरटीई-२०१३ नुसार शिक्षणाचा मूलभूत हक्क कळसगादे येथे गेल्या वर्र्षीपासून आठवीचा वर्ग सुरू केला होता. आठवीच्या वर्गाला शिक्षण विभागाकडे रितसर अर्जही दाखल केला होता. मात्र, काही संस्थाचालकांनी अडथळा निर्माण करून मिळणारी मान्यता थांबविली होती. असा समज करून घेऊन कळसगादे ग्रामस्थांनी गेल्या तीन तारखेपासून बेमुदत शाळा बंद आंदोलन सुरू केले होते. जोपर्यंत आठवीच्या वर्गाला मान्यता मिळणार नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवणार, असा निर्धार केला. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांसह, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे शिष्टमंडळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटले होते. कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून आठवीच्या वर्गाला मान्यता मिळविण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषदतर्फे पुणे येथील शिक्षण आयुक्तांच्याकडे पाठविला आहे.दरम्यान, शुक्रवारी आमदार संध्यादेवी कुपेकर, जि. प.सदस्य राजेंद्र परीट, नंदा बाभूळकर, सभापती ज्योती पाटील, उपसभापती शांताराम पाटील, गटशिक्षणाधिकारी एस. डी. डवरी, जि. प. सदस्य शिवप्रसाद तेली, माजी सभापती अमर चव्हाण, अॅड. संतोष मळवीकर यांच्यासह शिष्टमंडळाने कळसगादे शाळेला भेट देऊन शाळा आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी आठवीच्या वर्गाला मान्यता देऊ, असे लेखी आश्वासन गटशिक्षणाधिकारी डवरी यांनी दिले.
आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी शाळेचे कुलूप काढल्यानंतर शाळा सुरू झाली. सरपंच प्रमिला गवस, उपसरपंच, चंद्रकांत गडकरी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप दळवी, तंटामुक्त अध्यक्ष शंकर दळवी उपस्थित होते. (प्रतिनिधी)