अखेर बेबी पाटणकर ताब्यात
By Admin | Updated: May 10, 2015 00:43 IST2015-05-10T00:40:20+5:302015-05-10T00:43:04+5:30
अमली पदार्थ साठा प्रकरण : पाच दिवसांची कोठडी

अखेर बेबी पाटणकर ताब्यात
खंडाळा : कण्हेरी (ता. खंडाळा) येथून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थ साठ्यातील मुख्य सूत्रधार बेबी पाटणकर अखेर खंडाळा पोलिसांच्या जाळ्यात अडकली. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्याचा मार्ग मोफत झाला असून, मॅफिडॉन प्रकरणाचा उलगडा लवकरच होणार आहे. बेबी पाटणकर हिला खंडाळा न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची कोठडी देण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कण्हेरी येथे मुंबई पोलिसातील हवालदार धर्मराज काळोखे याच्याकडे सुमारे २२ कोटींचा ११२ किलो मॅफिडॉन पोलिसांनी छापा टाकून जप्त केला होता. धर्मराज काळोखे याचा कसून तपास केला असता मुंबईस्थित बेबी पाटणकर ही मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली होती. तेव्हापासून खंडाळा पोलिसांनी बेबी पाटणकराचा शोध सुरू केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तेथे सापडलेल्या १२ किलो अमली पदार्थाच्या गुन्ह्यात बेबी पाटणकरला अटक केली. त्यानंतर मुंबई पोलिसांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर बेबी पाटणकरला या गुन्ह्यात खंडाळा पोलीस पथकाने ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक दीपक हुंबरे, एस. एस. गोडबोले, एस. टी. बारेला, गुन्हेअन्वेषणचे भिसे यांनी ही कारवाई केली. अधिक तपास खंडाळा पोलिसांकडून सुरू आहे. (प्रतिनिधी)