आंदोलनानंतर प्रश्न मार्गी
By Admin | Updated: January 20, 2015 23:47 IST2015-01-20T23:30:03+5:302015-01-20T23:47:37+5:30
कुलगुरूंना घेराव : कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यश

आंदोलनानंतर प्रश्न मार्गी
कोल्हापूर : ग्रंथालयीन वेळेत बदल करावा, वसतिगृहात मुलींची राहण्याची सोय करावी, या प्रमुख मागण्यांसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी काल, सोमवारी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांना विद्यार्थ्यांनी घेराव घातला. याची दखल घेत प्रशासन कामाला लागले असून, ग्रंथालयाच्या वेळेत बदल केले आहेत. विद्यार्थिनींना राहण्यासाठी प्राध्यापकांच्या रिकाम्या निवासस्थानी व्यवस्था करण्याचे काम सुरू होते.
कृषी महाविद्यालयातील वसतिगृहात गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्याचा निर्णय यंदापासून घेण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांना बाहेर राहावे लागत होते. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत होता. हा निर्णय रद्द करावा. महाविद्यालयातील कँटीनचा दर्जा, ग्रंथालयाच्या वेळेत बदल करावा, या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांनाच येथील कृषी महाविद्यालयातील गेस्ट हाऊस येथे घेराव घातला होता.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत मोरे यांनी प्रशासनाला विद्यार्थ्यांचे प्रश्न तत्काळ सोडविण्याबाबत सूचना दिल्या. आंदोलनात सुमारे सहाशे विद्यार्थी सहभागी झाले होते.