तब्बल ३ वर्षांनंतर कळाले...‘गडहिंग्लजचे सभापती’ कुणाचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:29 IST2021-09-17T04:29:31+5:302021-09-17T04:29:31+5:30
जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील ‘ताराराणी आघाडी’कडून निवडून आलेल्या माजी सभापती विजयराव पाटील यांची थेट गडहिंग्लज तालुका ...

तब्बल ३ वर्षांनंतर कळाले...‘गडहिंग्लजचे सभापती’ कुणाचे?
जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील ‘ताराराणी आघाडी’कडून निवडून आलेल्या माजी सभापती विजयराव पाटील यांची थेट गडहिंग्लज तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांच्या ‘सभापती’ निवडीनंतर रंगलेल्या सांगा सभापती कुणाचे..? या प्रश्नाचे उत्तर तब्बल ३ वर्षांनंतर मिळाले आहे.
२०१८ मध्ये गडहिंग्लज पंचायत समितीच्या तत्कालीन सभापती जयश्री तेली यांना पदावरून दूर करून राज्यात त्यावेळी सत्तेत असणाऱ्या भाजपाला गडहिंग्लज पंचायत समितीच्या सत्तेतून पायउतार करण्यात विजयराव पाटील यांचाच पुढाकार होता. पडद्यामागून काँग्रेस-राष्ट्रवादी व स्वाभिमानी यांचे पाठबळ त्यांच्या मागे होतेच.
सभापतीपदी निवड झाल्यानंतर त्यांनी संध्यादेवी कुपेकर, हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते. परंतु, ‘ताराराणी’चे सदस्य असूनही आघाडीचे नेते महादेवराव महाडिक यांची भेट घेणे त्यांनी टाळले होते. त्यादरम्यान, गडहिंग्लजचे सभापती आमच्यासोबत आहेत असे सूचक विधान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी केले होते. त्याला या निवडीने पुष्टी मिळाली आहे.
मूळच्या काँग्रेस विचाराच्या महागाव येथील इनामदार पाटील घराण्यातील विजयरावांच्या गळ्यात तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदाची माळ घालून पालकमंत्र्यांनी ऐन गणेशोत्सवाच्या काळात गडहिंग्लज तालुक्यातील ‘काँग्रेस’च्या विस्ताराचा श्रीगणेशा केल्याची जिल्ह्यात चर्चा आहे.
चौकट :
विजयरावांची पार्श्वभूमी?
गडहिंग्लजचे पहिले सभापती दिवंगत शिवगोंडराव आण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र असणारे विजयराव पाटील हे वडिलांच्या पश्चात सभापतीपदीपदाची संधी मिळालेले गडहिंग्लजच्या इतिहासातील पहिलेच कार्यकर्ते आहेत. जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांचे ते सख्खे चुलत बंधू होत. अप्पींच्या राजकीय वाटचालीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. किंबहुना, पडद्यामागची सूत्रधाराची भूमिका तेच सांभाळत. म्हणूनच अप्पीनीच त्यांना राजकारणात आणले. परंतु, ‘ताराराणी’च्या सभापतीविरुद्ध बंड केल्यामुळे दोघांमध्ये दुरावा आला आहे. (कारण, अप्पी पाटील हे जिल्हा पातळीवर महाडिक यांचे नेतृत्व मानतात.)
चौकट :
काँग्रेसला बळ मिळणार..!
गेल्या काही वर्षांपासून महागावचे राजकारण पाटील व पताडे या दोन गटाभोवतीच फिरत आले आहे. पताडे गटाचे प्रमुख प्रकाशभाई पताडे यांनी अलिकडेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. परंतु, गेल्यावेळची विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीतर्फे लढविलेल्या अप्पी पाटील यांनी अद्याप कोणतीच नवी राजकीय भूमिका घेतलेली नाही. दरम्यान, सभापती निवडीपासून काँग्रेससोबत राहिलेल्या विजयरावांनी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. त्यामुळे महागाव-भडगाव जिल्हा मतदारसंघासह तालुक्यातही काँग्रेसला बळ मिळण्यास मदत होणार आहे.
विजयराव पाटील : १६०९२०२१-गड-०६