करवीरमध्ये १७ ग्रामपंचायतींत सत्तांतर

By Admin | Updated: July 28, 2015 01:23 IST2015-07-28T00:37:08+5:302015-07-28T01:23:59+5:30

स्थानिक आघाड्यांसह काँग्रेसचा वरचष्मा : सडोली पी. एन. पाटलांकडे, कोपार्डे, शिये, कुडित्रे शिवसेनेकडे

After 17 gram panchayat elections in Karveer | करवीरमध्ये १७ ग्रामपंचायतींत सत्तांतर

करवीरमध्ये १७ ग्रामपंचायतींत सत्तांतर

कसबा बावडा : करवीर तालुक्यात अत्यंत चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये १७ ठिकाणी सत्तांतर झाले, तर २० ठिकाणी सत्ता कायम राखण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले. अन्य ठिकाणी त्रिशंकू अवस्था आहे. निकालामध्ये स्थानिक आघाडींसह कॉँग्रेसने आपला वरचष्मा कायम राखला आहे. कोपार्डे, खटांगळे, कुडित्रे, शियेमध्ये शिवसेनेने मुसंडी मारली. निकाल घोषित होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.तालुक्यात ५४ ग्रामपंचायतींमध्ये ८० टक्के मतदान झाले होते. निवडणुकीत स्थानिक पातळीवरील नेत्यांसह तालुका स्तरावरील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. करवीर मतदारसंघात कॉँग्रेस विरोधात शिवसेना, शेकाप, राष्ट्रवादी, तर काही ठिकाणी कॉँग्रेस अंतर्गत लढाई झाली. दक्षिणेत मात्र काही गावांचा अपवाद वगळता माजी गृहराज्यमंत्री सत्तेज पाटील व महाडिक गटांत सामना झाला. करवीरमध्ये कॉँग्रेसने, तर दक्षिणमध्ये सतेज पाटील गटाने बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये आपले वर्चस्व राखले. नरके गटाने काही महत्त्वपूर्ण गावांत सत्तांतर घडवून सेनेने वर्चस्व दाखविले. सडोली खालसा गावात सत्तांतर घडवून माजी आमदार पी. एन. पाटील गटाने सत्ता काबीज केली. सडोली खालसा गावात नेत्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
सोमवारी सकाळी ९ वाजता कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी झाली. मतमोजणीसाठी करवीरचे तहसीलदार डॉ. योगेश खरमारे व नायब तहसीलदार अनंत गुरव यांनी एकाचवेळी सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी न घेता मतमोजणीच्या नऊ फेऱ्या केल्या. प्रत्येक फेरीत पाच ते सहा ग्रामपंचायतींची मोजणी करण्यात आली. अवघ्या १५ ते २० मिनिटांत ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर होत होते. निकाल लागलेले उमेदवार बाहेर गेल्यावरच दुसऱ्या पाच-सहा ग्रामपंचायतींना आत घेतले जात होते. त्यामुळे मतमोजणी अवघ्या तीन तासांत शांततेत पार पडली. यावेळी पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)


एकादशीला त्यांना पांडुरंग पावला
गिरगाव व कोगील बुद्रक ग्रामपंचायतींमध्ये दोन्हीही उमेदवारांना समान मते पडली. गिरगाव ग्रामपंचायतीच्या सुरेश पाटील व सुरेश जाधव यांना समान ३३२ मते पडली. चिठ्ठीद्वारे सुरेश पाटील विजयी झाले. कोगील बुद्रुकमध्ये चिठ्ठीद्वारे रघुनाथ गणेशाचार्य विजयी झाली. चिठ्ठीद्वारे विजय झाल्यामुळे पांडुरंग पावला, अशी चर्चा मतमोजणीवेळी झाली.

केर्ली येथे त्रिशंकू स्थिती
केर्ली ग्रामपंचायतीमध्ये त्रिशंकू अवस्थेमुळे सत्तेचा गुंता निर्माण झाला आहे. एकूण १३ पैकी ५ जागा सत्ताधारी विष्णू पाटील गटाला, बाबासाहेब चौगुले गटाला ४, माजी सरपंच विश्वनाथ पोवार यांच्या गटाला चार जागा मिळाल्या आहेत. सरपंचपदासाठी तिन्ही गटांनी दावा केल्यामुळे पडद्यामागच्या हालचालींना वेग आला आहे.

सत्तांतर झालेल्या ग्रामपंचायती
हालसवडे, निगवे दुमाला, कुडित्रे, हळदी, सडोली खालसा, म्हालसवडे, घानवडे, आरे, खुपीरे, पाटेकरवाडी, कोगील खुर्द, पडवळवाडी, शिये, कळंबे तर्फ कळे, कोपार्डे, महे.

Web Title: After 17 gram panchayat elections in Karveer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.