पंचगंगा नदी प्रदूषणप्रकरणी प्रतिज्ञापत्र

By Admin | Updated: January 16, 2015 00:25 IST2015-01-16T00:24:40+5:302015-01-16T00:25:44+5:30

सोमवारी पुढील सुनावणी : प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली माहिती

Affidavit for Panchaganga river pollution | पंचगंगा नदी प्रदूषणप्रकरणी प्रतिज्ञापत्र

पंचगंगा नदी प्रदूषणप्रकरणी प्रतिज्ञापत्र

कोल्हापूर : येथील पंचगंगा नदीप्रदूषण रोखण्यासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत आणि सध्याची परिस्थिती काय आहे, या अनुषंगाने आज, गुरुवारी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर येथील उपप्रादेशिक अधिकारी कार्यालयातर्फे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. यासंदर्भात आता पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. उच्च न्यायालयाने कोल्हापूर जिल्हा परिषद, महानगरपालिका, इचलकरंजी नगरपालिका, एमआयडीसी यांनाही स्वतंत्रपणे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर आज न्यायालयात जातीने उपस्थित होते. एमआयडीसीने प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती देण्यासाठी २ फेब्रुवारीपर्यंत वेळ मागून घेतली आहे. जिल्हा परिषदेने १९ डिसेंबरला न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते, त्यावर २१ डिसेंबरला सुनावणीही झाली आहे.
सुरुवातीस पंचगंगा नदी प्रदूषणाच्या बाबतीत आपली जबाबदारी झटकणाऱ्या सर्वच जबाबदार घटकांना न्यायालयाने नोटिसा काढून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिल्यामुळे सर्वच यंत्रणा आता कामाला लागल्या आहेत. विशेष म्हणजे विभागीय आयुक्तांनीही पंचगंगा प्रदूषणप्रकरणी एक समिती नियुक्त केली आहे. त्या समितीचे प्रमुख म्हणून करवीरचे प्रांत काम पाहत आहेत. या समितीने गेल्या आठवड्यात पूर्ण पंचगंगा नदीची पाहणी करून माहिती संकलित केली आहे. पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी घेतले आहेत. पुढील महिन्यात हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. हा अहवाल विस्तृत असणार आहे. जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली आढावा समिती कार्यरत असून या समितीतर्फेही माहिती घेण्यात येत असते. पंचगंगा नदीच्या प्रदूषणासंदर्भात दाखल झालेल्या याचिकांवर एकत्रित सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्यासमोर सुरू आहे. इचलकरंजी येथील दत्तात्रय माने यांच्यावतीने अ‍ॅड. धैर्यशील सुतार, तर कोल्हापुरातील प्रजासत्ताक सामाजिक संघटनेतर्फे अ‍ॅड. राहुल वाळवेकर हे न्यायालयातील कामकाज पाहत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Affidavit for Panchaganga river pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.