रेल्वेच्या ई-तिकीट सेवेचा गैरफायदा
By Admin | Updated: August 1, 2014 23:25 IST2014-08-01T22:37:31+5:302014-08-01T23:25:04+5:30
एजंटांची चांदी : तिकिटे इंटरनेटवर उपलब्ध

रेल्वेच्या ई-तिकीट सेवेचा गैरफायदा
सदानंद औंधे-मिरज , रेल्वेच्या तिकीट खिडकीसोबत तात्काळ ई-तिकीट उपलब्ध होऊ लागल्याने अनधिकृत तिकीट एजंटांची चांदी झाली आहे. सर्वसामान्य प्रवाशांना घरबसल्या ई-तिकीट उपलब्ध होण्यासाठी सुरू केलेल्या सुविधेचा एजंटांनी गैरफायदा घेतल्याने सामान्य प्रवाशांना तात्काळ तिकीट मिळणे दुरापास्त झाले आहे. रेल्वेच्या संकेतस्थळावरून इंटरनेटद्वारे तिकिटे काढणाऱ्या एजंटांवर नियंत्रण ठेवणे सुरक्षा यंत्रणांना कठीण झाले आहे.
आरक्षित तात्काळ तिकिटांना मोठी मागणी आहे. या तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रवासी व तिकीट काढणाऱ्याला ओळखपत्राची सक्ती, सकाळी दहा वाजता तात्काळ तिकीट विक्री, तिकीट खिडकी सुरू झाल्यानंतर दोन तासानंतर ई-तिकिटाची उपलब्धता अशा उपाययोजना प्रशासनाने केल्या आहेत. तात्काळ तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर दोन तासांनंतर इंटरनेटवर ई-तिकीट उपलब्ध होत असल्याने एजंट तिकिटासाठी रात्रभर रेल्वेस्थानकातील तिकीट खिडक्यांवर रांगा लावत होते. मात्र, महिन्याभरात प्रशासनाने या धोरणात बदल केला असून, सामान्य प्रवाशांसाठी दहापासून इंटरनेटवर तात्काळ ई-तिकीट उपलब्ध करण्यात आले आहे.