लोकमत न्यूज नेटवर्क
पेठवडगाव: रयतेच्या कल्याणाबरोबर स्त्रियांना सन्मानाचे स्थान देऊन खऱ्या अर्थाने स्वराज्य स्थापनेचे महान कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन जीवनाच्या यशस्वी होण्याची प्रेरणा मिळते. जीवनात यशस्वी होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजाच्या कौशल्यांचा अंगीकार करा, असे
प्रतिपादन वक्ते व शिव अभ्यासक प्रा. संतोष पाटील यांनी केले.
येथील विजयसिंह यादव महाविद्यालयातील उद्योजकता विकास केंद्र व बेटी बचाव अभियान अंतर्गत आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात प्रा.पाटील बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजया चव्हाण होत्या.पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, नियोजन व व्यवस्थापन कौशल्यांचा अभ्यास करणे ही आजच्या काळाची गरज आहे. शिवचरित्रातील संघर्षमय इतिहासा इतकीच प्रेरणा शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याच्या अभ्यासाने मिळते.
प्रास्ताविक डॉ. सचिन पवार यांनी केले. डॉ. प्रशांत यादव यांनी आभार मानले. यावेळी डॉ. दिनेश भंडारे, अधिकराव निकम, बाळासाहेब जाधव, अशोक चव्हाण, अतिश खांडेकर आदी उपस्थित होते.
ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमात प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.