शिक्षकांनी घेतले दहा विद्यार्थिनींना दत्तक

By Admin | Updated: January 20, 2015 23:47 IST2015-01-20T23:24:27+5:302015-01-20T23:47:48+5:30

उपक्रमशील शाळा : धुंदवडे विद्यामंदिरातील अनोखा उपक्रम

Admitted to 10 students by teachers | शिक्षकांनी घेतले दहा विद्यार्थिनींना दत्तक

शिक्षकांनी घेतले दहा विद्यार्थिनींना दत्तक

मारूती शिंदे - साळवण -विद्यार्थी आणि समाजहित यांची जाण ठेवून अहोरात्र झटणाऱ्या शिक्षकांमुळे अनेक शाळा नावारूपास आल्या आहेत. शाळा हेच आमुचे आनंदनिधान। अर्पू तन मन शाळेसाठी ।। शालामंदिरात विद्यार्थीच देव । झिजवू आमचा जीव त्यांच्यासाठी ।। या उक्तीप्रमाणे काम करणाऱ्या विद्यामंदिर धुंदवडे (ता. गगनबावडा) या शाळेतील दहा शिक्षकांनी गरीब, कष्टकरी, शेतमजूर कुटुंबातील दहा विद्यार्थिनींना शिक्षणासाठी दत्तक घेऊन शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. शिक्षकांचे कष्ट, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची उत्साही साथ यामुळे या शाळेची उपक्रमशील आणि आदर्श शाळा म्हणून ओळख आहे.
धामणी खोऱ्यातील दुर्गम धुंदवडे विद्यामंदिरात पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग आहेत. ही शाळा सतत गुणवत्ता विकास उपक्रम राबवते त्यामुळे या शाळेला ‘ए प्लस’ शैक्षणिक दर्जा मिळाला आहे. या शाळेने सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात तालुक्यात प्रथम, तर जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. या शाळेला ‘स्वच्छ, सुंदर हिरवी शाळा’ पुरस्कार मिळाला आहे. स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यात या शाळेने सलग आठ वर्षे जिल्ह्याचे विजेतेपद पटकाविले आहे, चौथी शिष्यवृत्तीत १५, तर सातवी शिष्यवृत्तीत २८ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे.
या शाळेने विविध उपक्रम राज्याला दिले आहेत. स्काऊट गाईड, समाजसेवा संस्कार शिबिर प्राथमिक शाळेत निवासी स्वरूपात राबविणारी ही जिल्ह्यातील पहिली शाळा आहे. तीन दिवसीय शिबिरात विद्यार्थ्यांच्या चहा, नाष्टा, जेवणाची सोय ग्रामस्थ करतात.
‘वेध भविष्याचा’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांना रोज वेगवेगळे प्रश्न देऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. घागर, तांब्या, टाळ, आदी. टाकाऊ साधनांपासून तयार केलेल्या संगीत साहित्यावर होणारा संगीत परिपाठ जिल्हाभर प्रसिद्ध आहे. ‘शाळा गावाची, गाव शाळेचा’ या भावनेतून ग्रामस्थ लोकवर्गणीद्वारे मदत करतात. ही शाळा ‘बिनकुलपाची‘ शाळा म्हणून प्रसिद्ध आहे. गटशिक्षणाधिकारी एम. एस. मांडे, शिक्षण विस्तार अधिकारी डी. सी. कुंभार, केंद्रप्रमुख ए. बी. कोळेकर यांच्या मार्गदर्शनाबरोबरच शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ शाळेच्या उपक्रमांत सहकार्य करतात.


थेट 'एसएमएस'द्वारे संवाद
विद्यार्थ्यांची, शाळेची प्रगती व माहिती मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे पालकांपर्यंत पोहोचविली जाते. ‘वे टू एसएमएस’द्वारे माजी विद्यार्थ्यांशीही संपर्क साधला जातो. सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात अध्यापक व्ही. पी. पाटील यांनी कन्यारत्न झालेल्या पालकांच्या नावावर ५०० रुपयांची ठेव ठेवण्याचा उपक्रम राबविला आहे

Web Title: Admitted to 10 students by teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.