शालेय क्रीडा स्पर्धांच्या प्रवेश शुल्कात तिपटीने वाढ

By Admin | Updated: July 19, 2015 23:35 IST2015-07-19T23:19:25+5:302015-07-19T23:35:39+5:30

खेळाडूंमध्ये नाराजी : आयोजकांना मात्र दिलासा

Admission charges for school sports competitions triple increase | शालेय क्रीडा स्पर्धांच्या प्रवेश शुल्कात तिपटीने वाढ

शालेय क्रीडा स्पर्धांच्या प्रवेश शुल्कात तिपटीने वाढ

सहदेव खोत-पुनवत -चालूवर्षी होणाऱ्या शालेय व ग्रामीण क्रीडा स्पर्धांच्या प्रवेश शुल्कात शासनाने राज्यात सर्वत्रच जवळपास तिपटीने वाढ केल्याने क्रीडाशिक्षक, खेळाडू व क्रीडाप्रेमींमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना मात्र वाढीव अनुदान मिळणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
राज्यात सर्वत्र यावर्षीच्या शालेय व ग्रामीण क्रीडा स्पर्धांना आॅगस्टपासून सुरुवात होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा परिषदेमार्फत क्रीडा शिक्षकांच्या सभा घेऊन स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र यावर्षीपासून शासनाने स्पर्धांच्या सांघिक व वैयक्तिक प्रवेश फी शुल्कात प्रचंड वाढ केल्याने क्रीडा वर्तुळात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शासन नेहमी खेळांना प्रोत्साहन देत असते, मग प्रवेश शुल्क वाढविल्यानंतर खेळातील सहभागावर परिणाम होणार, या मुद्द्याचा विचार शासनाने गांभीर्याने केला नसल्याचे या शुल्क वाढीवरून दिसून येत आहे.
ग्रामीण भागात खेळाडूंचा सर्वच खर्च जवळपास शाळांनाच करावा लागतो. क्रीडा शिक्षकाला तर यात मोठा आर्थिक भुर्दंड बसतो. आता प्रवेश शुल्क प्रचंड वाढल्याने बरेच खेळाडू शुल्क भरण्याची ऐपत नसल्याने खेळांपासून वंचित राहणार आहेत. शिवाय खेळाडूला आग्रह करावा, तर खेळाडूंचे शुल्क शिक्षकांनाच भरावे लागणार आहे. त्यामुळे क्रीडाशिक्षकांमध्ये या शुल्क वाढीबद्दल नाराजीचे वातावरण पसरले आहे.
एकंदरीत एकीकडे क्रीडा प्रवेश शुल्कातील प्रचंड वाढ, तर दुसरीकडे आयोजकांना दिलासा यामुळे क्रीडा क्षेत्रात ‘थोडी खुशी, बहुत गम’ अशाच भावना व्यक्त होत आहेत. शासनाने प्रवेश शुल्काबाबत शहरी आणि ग्रामीण भागाचा व तेथील आर्थिक परिस्थितीचा गांभीर्याने फेरविचार करावा व वाढ मागे घ्यावी, अशी मागणी क्रीडा क्षेत्रात होत आहे.

आयोजकांना दिलासा
क्रीडा स्पर्धांचे तालुका, जिल्हा विभाग, राज्य व राष्ट्रीय पातळीवर आयोजन करणाऱ्या आयोजकांना नवीन धोरणानुसार वाढीव अनुदान मिळणार असल्याने त्यांना मात्र दिलासा मिळाला आहे.

खेळ प्रकारगतवर्षीचे शुल्क (२०१४)यावर्षीचे शुल्क (२०१५)
सांघिक१५ रुपये५० रुपये (प्रत्येक खेळासाठी)
वैयक्तिक१० रुपये२५ रुपये (प्रत्येक खेळाडूसाठी प्रत्येक खेळासाठी)

Web Title: Admission charges for school sports competitions triple increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.