शासन आदेश मोडणाºया ‘गोकुळ’वर प्रशासक नेमा: सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 19:15 IST2017-11-03T19:10:50+5:302017-11-03T19:15:50+5:30

शासन आदेश मोडणाºया ‘गोकुळ’वर प्रशासक नेमा: सतेज पाटील
कोल्हापूर : विविध कारणांनी अडचणीत आलेल्या दूध व्यवसायाला सावरण्यासाठी राज्य सरकारने जून २०१७ मध्ये म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ करण्याचे आदेश राज्यातील दूध संघांना दिले; पण ‘गोकुळ’ने गाय दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात करून शासन आदेशाला ‘केराची टोपली’ दाखविल्याने त्यांच्यावर सहकार कलम ७८ (अ) नुसार प्रशासक नेमावा, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी सहायक निबंधक(दुग्ध) अरुण चौगले यांच्याकडे केली.
आमदार पाटील म्हणाले, सर्वसाधारण सभा कशी झाली हे उत्पादकांना माहिती आहे. प्रोसेडिंगबरोबर प्रसारमाध्यमांतील वृत्तांचा उल्लेख अहवालात करणे अपेक्षित होते. याबाबत आम्ही न्यायालयात जाणार आहोतच पण शासनाने आदेश देऊनही गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची कपात ‘गोकुळ’ ने केली आहे. यावर तरी आपल्याकडून उचित कार्यवाही व्हावी. ज्या संस्थांना सरकारकडून वित्तीय सहाय्य मिळते, त्यांना शासननिर्णय बंधनकारक असतो. दि. १९ जूनला दूध दरवाढीबाबत काढलेल्या शासननिर्णयाला ‘गोकुळ’ संचालकांनी केराची टोपली दाखवली आहे. अगोदरच महागाईने मेटाकुटीला आलेला उत्पादक दरकपातीने हैराण झाला असून सहकार कलम ७८ (अ) नुसार प्रशासक नियुक्तीची कारवाई करावी. अशी मागणी त्यांनी केली.
दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा दरवाढीचा अध्यादेश प्रसिद्धीसाठी होता का? उत्पादकांबरोबर सरकारच्या डोळ्यांत धूळफेक करणाºया ‘गोकुळ’वर हिंमत असेल तर त्यांनी कारवाई करावी, असेही पाटील यांनी सांगितले. दरम्यान, दरकपातीबाबत ‘गोकुळ’कडून खुलासा मागितल्याचे अरुण चौगले यांनी सांगितले. ऋतुराज पाटील, सदाशिव चरापले, बाळ कुपेकर, विजयसिंह मोरे, किरणसिंह पाटील, बाबासाहेब चौगले, शशिकांत खोत, किशोर पाटील, प्रदीप झांबरे, निवास पाटील, विलास साठे, दशरथ माने, राऊ पाटील, मोहन सालपे, बाबासाहेब देवकर, विश्वास नेजदार, अंजना रेडेकर आदी उपस्थित होते.
‘सोलापूर’ संघाच्या संचालकांना नोटिसा
शासन आदेश होऊन दूध दरवाढ न केल्याबद्दल विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालकांना नोटिसा बजावल्या आहेत. पंधरा दिवसांच्या आत खुलासा सादर न केल्यास अथवा असमाधानकारक खुलासा असल्यास ‘कलम ७८’ (अ) नुसार कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
-
उचलीबाबत पालकमंत्र्यांनी मध्यस्थी करावी
उसाच्या पहिल्या उचलीबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मध्यस्थी करून तोडगा काढावा व हंगाम लवकर सुरू करावा, असे पाटील यांनी सांगितले.