जलपर्णी हटविण्यात प्रशासन नापास
By Admin | Updated: June 24, 2015 00:56 IST2015-06-23T23:27:59+5:302015-06-24T00:56:53+5:30
समस्या बिकट : नदीला पूर आल्यानंतरच जलपर्णी वाहून जाणार

जलपर्णी हटविण्यात प्रशासन नापास
कुरुंदवाड : पंचगंगा नदीत पाणी प्रदूषणाबरोबरच जलपर्णीचीही समस्या गंभीर आहे. जलपर्णी हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून फारसे प्रयत्नही केले जात नाहीत. त्यामुळे ही समस्या बिकट होत असून, पुराच्या काळात जलपर्णी वाहून गेल्यावरच नदीला मुक्ती मिळते. त्यामुळे जलपर्णी वाहून जाण्यासाठी पंचगंगा नदीकाठावरील नागरिक पुराच्या प्रतीक्षेत आहेत.
पंचगंगा नदी प्रदूषणाचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला सोसावा लागत आहे. मात्र, या नदी प्रदूषणाबरोबर जलपर्णीची समस्याही तितकीच गंभीर आहे. पंचगंगा नदीवर तेरवाड व शिरोळ हे शेवटचे बंधारे आहेत. जलपर्णी या बंधाऱ्याला तटल्याने संपूर्ण नदीपात्र जलपर्णीने व्यापते. ऐन उन्हाळ्यातच ही समस्या निर्माण होते. जलपर्णीची समस्या गंभीर बनल्यानंतरच जिल्हा प्रशासन ते हटविण्यासंदर्भात नियोजन करते. मात्र, चार ते पाच फूट उंचीचा थर निर्माण होत असल्याने जलपर्णी पूर्ण हटविणे जिकिरीचे बनते. अखेर महापुरातूनच जलपर्णी वाहून जाते. निसर्गाने निर्माण केलेले संकट निसर्गच मुक्त करतो. त्यामुळे जलपर्णी वाहून जाण्यासाठी पंचगंगा नदीकाठचे नागरिक व शेतकरी पुराच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या पावसाला सुरुवात झाल्यामुळे पंचगंगा तुडुंब भरून वाहत आहे. नदीवरील पूल, बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्यानंतरच जलपर्णी वाहून जाते. पाण्यामुळे जलपर्णी पात्रातून वर येत असून, लवकरच पंचगंगा नदी जलपर्णीमुक्तहोण्याची शक्यता आहे.
जलपर्णीमुळे आॅक्सिजनचे प्रमाण घटते
हवेतील आॅक्सिजन पाण्यात विरघळल्यावरच जलचरांना श्वास घेणे शक्य आहे. मात्र, नदीपात्र जलपर्णीने व्यापल्याने, तसेच प्रदषणामुळे पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊन मासे मृत पावण्याच्या घटना घडत असतात.