कृती समितीसमोर प्रशासनाची उडाली भंबेरी
By Admin | Updated: December 7, 2014 00:58 IST2014-12-07T00:26:19+5:302014-12-07T00:58:35+5:30
‘सीपीआर’ बैठक : प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे आश्वासन

कृती समितीसमोर प्रशासनाची उडाली भंबेरी
कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर)च्या प्रश्नी सर्वपक्षीय बचाव कृती समिती आक्रमक झाल्याने प्रशासनाची भंबेरी उडाली. कार्यकर्ते आक्रमक झाल्याने हे प्रश्न तातडीने मार्गी लावू. त्यासाठी जिल्हा नियोजन विकास मंडळा (डीपीडीसी)मधून निधी देऊ, असे आश्वासन आज, शनिवारी करवीरचे प्रांताधिकारी प्रशांत पाटील यांनी दिले.
ताराबाई पार्क येथील शासकीय विश्रामगृह येथे सर्वपक्षीय सीपीआर बचाव कृती समितीबरोबर आरोग्य विभागाशी निगडित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी राजाराम माने यांचे प्रतिनिधी म्हणून प्रशांत पाटील आले होते. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दशरथ कोठुळे यांच्यावर कार्यकर्त्यांनी प्रश्नांचा भडिमार केला.
सर्वपक्षीय सीपीआर बचाव कृती समितीने महाविद्यालय प्रशासनाला
७ मे २०१४ रोजी सर्पदंश व श्वानदंश लस, औषधे, वैद्यकीय उपकरणे, आदी १९ मुद्द्यांचे निवेदन दिले होते. याचा पाठपुरावा प्रशासनाने किती केला? तसेच जिल्हाधिकारी माने यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे नियोजन होते. या बैठकीत आरोग्य उपसंचालक डॉ. आर. बी. मुगडे, जिल्हा परिषदेचे डॉ. पी. बी. पाटील, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त आरोग्याधिकारी योगेश साळे, समितीचे निमंत्रक वसंत मुळीक यांच्यासह भगवान काटे, शिरीष देशपांडे, संभाजीराव जगदाळे, बाबासाहेब देवकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)