जिल्ह्यातील ९७५ शिक्षक अतिरिक्त
By Admin | Updated: November 21, 2014 00:54 IST2014-11-21T00:42:22+5:302014-11-21T00:54:27+5:30
समायोजन अंतिम टप्प्यात : सर्र्वाधिक हातकणंगलेत; नव्याने भरती बंद

जिल्ह्यातील ९७५ शिक्षक अतिरिक्त
भीमगोंडा देसाई- कोल्हापूर --शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार यंदाच्या पटसंख्येनुसार जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने अतिरिक्त शिक्षकांची यादी तयार केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील ९७५ शिक्षक (सर) अतिरिक्त झाले आहेत. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्ह्यातच सर्वांचे समायोजन करण्यावर शिक्षण विभागाने ‘विशेष लक्ष’ केंद्रित केले आहे. सोयीच्या ठिकाणीच समायोजन व्हावे, यासाठी काही ‘सर’ लोकप्रतिनिधींकडून ‘फिल्डिंग’ लावीत आहेत.
जिल्ह्यात खासगी अनुदानित माध्यमिक शाळा ७०८ आहेत. या शाळांमध्ये शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार शिक्षकाला मान्यता दिली आहे. शहरी भागात ३०, तर ग्रामीण भागात २५ मुलांमागे एक शिक्षक असे प्रमाण आहे. दरम्यान, दिवसेंदिवस मुलांची संख्या झपाट्याने खालावत आहे. यामुळे सर्वच शाळांमधील पटसंख्या खाली येत आहे. परिणामी शिक्षकांची संख्या कमी होत आहे. अतिरिक्त होऊ नये म्हणून जून महिना सुरू झाल्यानंतर विद्यार्थी शोधण्यासाठी शिक्षक आणि संस्थाचालकांची धावपळ सुरू होते. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील ३० सप्टेंबरच्या पटसंख्येनुसार शिक्षक संच निश्चित केला आहे. विद्यार्थिसंख्या व कार्यरत असलेले शिक्षक, मंजूर पदे या सर्वांची माहिती घेण्यात आली आहे. नियमानुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांमध्ये डी. एड.धारकांची संख्या अधिक आहे. अतिरिक्त झालेला डी. एड.धारक पदवीधर असल्यास संबंधित संस्थेतच रिक्त जागा असल्यास समायोजन केले जात आहे. समायोजनाची प्रक्रिया गतीने सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील शिक्षणसंस्था चालक, मुख्याध्यापक यांची वर्दळ शिक्षण विभागामध्ये वाढली आहे. माध्यमिक शिक्षण विभाग गजबजून गेला आहे. आपल्या संस्थेतील अतिरिक्त शिक्षक बाहेर जाऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासंबंधी माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही.