व्यसनमुक्ती कागदावरच
By Admin | Updated: November 20, 2015 00:17 IST2015-11-19T21:02:36+5:302015-11-20T00:17:41+5:30
समाजकल्याण विभागाचे दुर्लक्ष : अंमलबजावणीसाठी समित्याच नाहीत

व्यसनमुक्ती कागदावरच
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यसनमुक्ती योजनेचे काम कागदावरच राबविले जात आहेत. शासन निर्णय असूनही समाजकल्याण विभागाकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या समित्याच स्थापन करण्यात आलेल्या नाहीत. या समित्या स्थापन करण्याबाबत हा विभाग अद्यापही अनभिज्ञ असल्याने व्यसनमुक्ती योजना जिल्ह्यात कागदावरच राबविली जात आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत सन २०११ मध्ये शासन निर्णय होऊन व्यसनमुक्ती योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समित्या स्थापन करून या समित्यांमार्फत जिल्ह्यात व्यसनमुक्तीचे काम प्रभावीपणे व्हावे. जिल्ह्यातील जनतेमध्ये व्यसनमुक्तीबाबत प्रचार प्रसिद्धी व्हावी, व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनापासून परावृत्त करण्याचे योगदान सर्व स्तरातून प्रभावीपणे व्हावे हा उद्देश ठेवून शासनाने या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक तालुकास्तरीय समित्यांचे गठण करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या शासन निर्णयापासून अद्यापही समाजकल्याण विभाग अनभिज्ञच आहे. (प्रतिनिधी)
शासन निर्णयाचे पालन नाही
व्यसनमुक्ती योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन गावागावातून उठाव झाला पाहिजे. जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी तसेच या धंद्यांमुळे व्यसनाधीन झालेल्या तरुणांना व्यसनापासून दूर करण्याची महत्त्वाची कामगिरी होणे गरजेचे आहे. पण या योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हा परिषद समाजकल्याण विभागच अनभिज्ञ असल्याने आणि शासन निर्णयाचे काटेकोर पालन या जिल्ह्यात केले जात नसल्याने या जिल्ह्यात व्यसनमुक्ती ही शासनाची महत्त्वपूर्ण योजना लोप पावल्याचे चित्र आहे.