मद्यपी पर्यटकांना आवर घालावा

By Admin | Updated: July 21, 2014 23:20 IST2014-07-21T23:16:02+5:302014-07-21T23:20:50+5:30

मांगेलीतील प्रकार : पोलिस निरीक्षकांना निवेदन

Add alcohol to tourists | मद्यपी पर्यटकांना आवर घालावा

मद्यपी पर्यटकांना आवर घालावा

कसई-दोडामार्ग : मांगेली येथे येणाऱ्या मद्यधुंद पर्यटकांच्या कृत्यांमुळे मांगेली ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मद्यप्राशन करुन धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांना वेळीच आवर घालण्याची मागणी मांगेलीवासियांनी दोडामार्ग पोलीस निरीक्षक जे. पी. सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
मांगेली येथील पंचायत समिती सदस्य महेश गवस, सरपंच पांडुरंग गवस, चेतन चव्हाण यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षकांची भेट घेत पर्यटकांना आवरण्याची मागणी केली. मांगेली फणसवाडी येथील धबधब्यावर मोठ्या संख्येने पर्यटक वर्षा पर्यटनासाठी येतात. यात गोव्यातील पर्यटकांची संख्या जास्त असते. रविवारीही मांगेलीत मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले होते. त्यांनाही या मद्यपी पर्यटकांचा त्रास सहन करावा लागला. मद्यपी पर्यटकांना रोखण्याकरीता उपस्थित पोलिसांची संख्या कमी असल्याने शक्य होत नाही. पर्यटकांच्या दंगामस्तीमुळे स्थानिक व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवणेच पसंत केले आहे. असे झाल्यास या पर्यटनाचा स्थानिकांना कोणताच फायदा होणार नाही. त्यामुळे पोलिसांची पर्यटनस्थळावरील संख्या वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
मद्यधुंद पर्यटकांकडून नशेमध्ये होणाऱ्या कृत्याकडे उपस्थित पोलीस दुर्लक्ष करतात. यामुळे मांगेलीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावू शकते. तसेच स्थानिकांमध्येही यामुळे भीती निर्माण होत असल्याने पोलिसांनी अशा मद्यपी पर्यटकांवर योग्य कारवाई न केल्यास स्थानिकांना कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशाराही मांगेली ग्रामस्थांनी यावेळी दिला. यावेळी पोलीस निरीक्षकांनी पर्यटनस्थळावर पोलीस बंदोबस्त असून येथे येणाऱ्या पर्यटकांनी मद्य नेवू नये यासाठी चेकनाक्यावर तपासणी केली जात असल्याचेही स्पष्ट करत मद्यपी पर्यटकांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मांगेली ग्रामस्थांना दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Add alcohol to tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.