कार्यकर्ते, उमेदवारांकडून निकालाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:22 IST2021-01-17T04:22:00+5:302021-01-17T04:22:00+5:30
सरदार चौगुले / लोकमत न्यूज नेटवर्क, पोर्ले तर्फ ठाणे : गावकारभारीपण होण्यासाठी नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी केलेली धडपड फळाला येते ...

कार्यकर्ते, उमेदवारांकडून निकालाची प्रतीक्षा
सरदार चौगुले / लोकमत न्यूज नेटवर्क,
पोर्ले तर्फ ठाणे : गावकारभारीपण होण्यासाठी नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी केलेली धडपड फळाला येते का? हे आता उद्या, सोमवारी निकालादरम्यान समजेल. तोपर्यंत मात्र सर्वच उमेदवारांना धडधडत्या अंत:करणाने निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सध्या कोणतीही निवडणूक, 'मनिपाॅवर' यांचे समीकरण बनले आहे. मतदानानंतर आता निकालाची उत्कंठा ताणली गेल्याने निवडणुकीत कोण बाजी मारणार, कुठं काय घडलं तर काय बिघडलं? याविषयीच्या चर्चा पारावरच्या कट्ट्यावर रंगत आहेत. मतदानानंतर उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असले तरी कार्यकर्ते, नेत्यांच्या आकडेमोडीला ऊतू आला आहे. प्रत्येकजण आपापल्या वॉर्डात, गल्लीत कोणकोणाला किती मते मिळाली याची आकडेमोड करीत होता. अटीतटीच्या लढती झालेल्या ठिकाणी दोन्ही, तिन्ही बाजूंचे कार्यकर्ते अंदाज मांडत होते. शनिवार, रविवार हे दमलेल्या कार्यकर्त्यांना विश्रांतीचे दिवस; परंतु निकालाची धीर-गंभीरता, उत्कंठा, कार्यकर्त्यांसह गटनेत्यांना लागून राहिली आहे.
चौकट
पैशाचा वारेमाप वापर
ग्रामपंचायत निवडणुकीतही यंदा मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाला. प्रचार यंत्रणा सक्षम करण्यासाठी सर्वच गटांकडून पाण्यासारखा पैसा ओतला जातो. पॅनेलप्रमुखांनी तिकीट वाटपावेळी निवडून येण्यासाठी त्या उमेदवाराची किती खर्च करण्याची ताकद आहे याचा विचार करून निर्णय घेतला होता. महिला उमेदवारांच्या तुलनेत पुरुष उमेदवारांना जास्त हात सैल सोडावा लागला होता.