गोपनीय बाबी उघड करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:25 IST2021-03-27T04:25:01+5:302021-03-27T04:25:01+5:30
कोल्हापूर : सत्तेच्या हव्यासापोटी कायदा मोडणे, यंत्रणेत दुफळी माजवणे, गोपनीय बाबी जगजाहीर करणे हा भाजपने केलेला राजद्रोहच आहे. सत्ता ...

गोपनीय बाबी उघड करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच
कोल्हापूर : सत्तेच्या हव्यासापोटी कायदा मोडणे, यंत्रणेत दुफळी माजवणे, गोपनीय बाबी जगजाहीर करणे हा भाजपने केलेला राजद्रोहच आहे. सत्ता कोणाची आहे, यापेक्षा राज्याची प्रतिमा डागाळली गेली हे अधिक क्लेशदायक असल्याने याच्या मुळाशी हे सरकार जाणार आहे. यात सहभागी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच आहे, असे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. गोपनीय बाबी उघड करायच्या नसतात, पण सत्तेच्या हव्यासापोटी फडणवीस यांनी ती नैतिकताही पाळली नाही, त्यामुळे थाेडी जरी विश्वासार्हता शिल्लक असेल तर त्यांनी स्वत:हून नावे जाहीर करावीत, असे आवाहनही पाटील यांनी केले.
कृषी विधेयकाच्या विरोधात शुक्रवारी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या निमित्ताने कोल्हापुरातही काँग्रेस कमिटीमध्ये एकदिवसीय उपोषण झाले. या आंदोलनापूर्वी पत्रकार बैठक घेऊन पालकमंत्री पाटील यांनी फोन टॅपिंगवरून भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, भाजपकडून बहुमत नसतानाही पुन्हा सत्तेवर येईन हा जयघोष अधिकाऱ्यांच्या जिवावरच केला जात होता, हे रश्मी शुक्ला प्रकरणामुळे जनतेपुढे आले आहे. सत्तेसाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचा, बहुमतातील सरकार पाडण्याचा उद्योग करण्यापेक्षा भाजपने विरोधी पक्ष म्हणून जबाबदारपणे काम करण्यातच महाराष्ट्राचे हित आहे, असा सल्लाही दिला.
राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने माहिती हाती लागल्यानंतर त्याची जाहीर वाच्यता करणे हे फडणवीस यांच्यासारख्या जबाबदार नेत्याला शोभत नाही. याचा राज्याच्या प्रतिमेवर व संबंधित अधिकाऱ्यांच्या सीआरवर परिणाम होतो. केंद्रातील एकाधिकारशाहीच्या दबावालाच हे अधिकारी बळी पडत असल्यानेच अशा घटना घडत असल्याचेही पाटील यांनी सांगितले. राज्यातील प्रशासकीय यंत्रणा, सुरक्षेच्या बाबतीतील गोपनीय अहवाल विरोधी पक्षनेत्यांकडे कुणी दिला, कसा बाहेर आला याचा तर आम्ही शोध घेऊच, पण गेली २० वर्षे राजकारणात विश्वासार्हता निर्माण करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी तो पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणे हे सुरक्षेच्या दृष्टीने चुकीचे आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
चौकट ०१
आमदारांनी उघडपणे बोलावे
राजेंद्र पाटील-यड्रावकर हे बाेलते झाले, अजून किती तरी जण यात असतील, त्यांनीही पुढे येऊन बोलायला हवे, नाही तर पुढे याचे गंभीर परिणाम राज्याला भोगावे लागतील, असा सूचक इशाराही दिला.
चौकट ०२
पोलिसांची प्रतिमा डागाळली
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या सर्व प्रकरणावर स्वत: चौकशीस सामोरे जाऊ असे सांगितल्याने त्यांचा खरेपणा सिद्ध होतो, असे सांगताना सतेज पाटील यांनी कोविड काळात अडीच लाख पोलिसांची उजळलेली प्रतिमा बेजबाबदार विरोधी पक्षनेत्यांमुळे डागाळली गेली, असा आरोपही केला.