जवाहरनगरात गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये हाणामारी

By Admin | Updated: October 10, 2016 00:58 IST2016-10-10T00:58:05+5:302016-10-10T00:58:05+5:30

तलवार हल्ला : दोघे गंभीर; वाहनांची तोडफोड

Action in two groups of goons in Jawaharagarh | जवाहरनगरात गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये हाणामारी

जवाहरनगरात गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये हाणामारी

कोल्हापूर : मित्राला मारहाण केल्याच्या रागातून जवाहरनगर येथील गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये शनिवारी मध्यरात्री जोरदार सशस्त्र मारामारी झाली. यावेळी झालेल्या तलवार हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले. हल्लेखोरांनी कार, रिक्षा, दुचाकींची तोडफोड करून परिसरात प्रचंड दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. जवाहरनगर सिरत मोहल्ला येथील एम.एम.जी. ग्रुपचा जाबीर मलबारी व आर. सी. ग्रुपच्या अमित बामणे यांच्यात राडा झाल्याची चर्चा आहे. बामणे याच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. खुनी हल्ला आणि वाहनांची तोडफोड होऊनही राजारामपुरी पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करत गुन्हेगारी टोळ्यांना अभय दिले आहे.
अधिक माहिती अशी, जवाहरनगर येथे गेल्या दोन दिवसांपासून गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये धुसफूस सुरू होती. शनिवारी दुपारी मोटारसायकलवरून जाणाऱ्या एका तरुणास मारहाण केली. त्याचे पडसाद मध्यरात्री उमटले. दोन्ही टोळ्या एकत्र आल्याने जोरदार राडा झाला. यावेळी सिरत मोहल्ला परिसरातील आठ ते दहा गाड्यांची तोडफोड करत प्रचंड दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंनी झालेल्या तलवार हल्ल्यामध्ये जाबीर मलबारी व अमित बामणे हे गंभीर जखमी झाले. बामणे याला सीपीआरमध्ये दाखल केले, तर मलबारी याला खासगी रुग्णालयात दाखल केले. घरासमोर पार्किंग केलेल्या गाड्या फोडल्याने नागरिकांनी राजारामपुरी ठाण्यात तक्रारी दिल्या. दरम्यान, जवाहरनगर व सिरत मोहल्ला परिसरातील दोन्ही बाजूंच्या प्रमुख व्यक्तींनी दोन्ही टोळ्यांमध्ये मध्यस्थी केल्याने या प्रकरणी रविवारी रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. (प्रतिनिधी)
 

Web Title: Action in two groups of goons in Jawaharagarh