इचलकरंजीत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईचा फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:07 IST2021-02-05T07:07:17+5:302021-02-05T07:07:17+5:30

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ (फोटो) लोकमत न्यूज नेटवर्क, इचलकरंजी : पंचगंगा नदी प्रदूषणाला जबाबदार घटकांवर कारवाई केल्याचा फार्स करत प्रदूषण ...

Action taken by Pollution Control Board in Ichalkaranji | इचलकरंजीत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईचा फार्स

इचलकरंजीत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईचा फार्स

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ

(फोटो)

लोकमत न्यूज नेटवर्क, इचलकरंजी : पंचगंगा नदी प्रदूषणाला जबाबदार घटकांवर कारवाई केल्याचा फार्स करत प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील नऊ प्रोसेसर्सना बंद ठेवण्याचे आदेश दिले. वीस प्रोसेसर्सना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत; परंतु हे सर्व कागदावर असून, प्रत्यक्षात मात्र सर्वकाही आलबेलपणाने सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासण्यात आला असून दिखावा करण्यासाठी जुजबी कारवाई केली जात आहे. यातून प्रदूषण नियंत्रण मंडळाचा 'कारभार' स्पष्टपणाने दिसत आहे. गेल्या आठवड्यात 'लोकमत'ने पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत वृत्तमालिका प्रसिद्ध केली. त्यामध्ये इचलकरंजीतील प्रोसेसर्स व नगरपालिकेचे सांडपाणी आजही पंचगंगा प्रदूषणास मुख्य जबाबदार घटक असल्याचे छायाचित्रांसह प्रसिद्ध केले होते. त्याचबरोबर मागील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नदी प्रदूषणाबाबत मंत्रालयात बैठक घेऊन प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या सर्वच घटकांवर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश दिले होते; परंतु येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाने सध्याच्या परिस्थितीवर तात्पुरते पांघरूण घालण्याच्या उद्देशाने नोटिसा बजावण्याचा नेहमीचा कार्यक्रम हाती घेतला. प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या प्रोसेसर्ससह सर्वच घटकांकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आजतागायत आलेल्या नोटिसांचे ढीग साचले आहेत. तरीही पुन्हा मंडळाने तोच कित्ता गिरवला. या सर्व प्रकारानंतर तरी काही फरक पडला आहे का, हे तपासण्याचा प्रयत्न केला असता बंदची नोटीस प्राप्त झालेल्या अमित प्रोसेसर्सची पाहणी केली, तर ती नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे आढळले. एसटीपी प्लॅन्टमधूनही नेहमीप्रमाणे पाणी काळ्या ओढ्यात सोडले जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई हा कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार असल्याचे दिसत आहे.

चौकटी

नऊ प्रोसेसर्सना बंदच्या नोटिसा

शहरातील हनुमान (शहापूर), भारत (जवाहरनगर), अमित (गंगानगर), कृष्णा (लक्ष्मी औद्योगिक वसाहत), वीरभद्र, श्रीराम (इंडस्ट्रियल इस्टेट), इंटरनॅशनल (कबनूर), सर्व्हेश्वर (शांतीनगर), सुतंतू (तिळवणी) या नऊ प्रोसेसर्सना पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत प्रोसेसर्स बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नगरपालिका नामानिराळे

प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही प्रोेससर्सना गुरुवारी (दि.२८) रात्री नोटिसा बजावल्या; परंतु तब्बल २० दशलक्ष लिटर मैलायुक्त सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट पंचगंगा नदीत मिसळत असताना नगरपालिकेला मात्र या कारवाईतून दुर्लक्षित ठेवले. शुक्रवारीपर्यंत त्यांना कोणतीही नोटीस प्राप्त झाली नव्हती.

(फोटो ओळी) २९०१२०२१-आयसीएच-०४ इचलकरंजीतील सीईटीपी प्रकल्पातून प्रक्रिया केलेले काळेकुट्ट फेसाळलेले पाणी थेट काळ्या ओढ्यात सोडले जाते.

२९०१२०२१-आयसीएच-०६

२९०१२०२१-आयसीएच-०७

२९०१२०२१-आयसीएच-०८ इचलकरंजीतील बंदचे नोटीस बजावलेले अमित प्रोसेसर्स सुरू असल्याचे आढळले.

Web Title: Action taken by Pollution Control Board in Ichalkaranji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.