रंकाळ्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

By Admin | Updated: January 22, 2015 00:19 IST2015-01-22T00:16:52+5:302015-01-22T00:19:51+5:30

स्थायी सभापती : भगदाडाची गंभीर दखल

'Action Plan' for Random | रंकाळ्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

रंकाळ्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

कोल्हापूर : ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या ढासळत असलेल्या तटबंदीचे काम सुरू करण्याबरोबरच अखेरच्या घटका मोजत असलेल्या रंकाळाच्या पुनरुज्जीवनाचे शिवधनुष्य आज, बुधवारी स्थायी समितीचे सभापती आदिल फरास यांनी उचलले. सोमवारी (दि. १९) रात्री पडलेल्या भगदाडाची पाहणी करून फरास यांनी तत्काळ ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या.अगोदरच प्रदूषणाने मरणासन्न झालेल्या रंकाळ्याची संरक्षक तटबंदी कोसळण्याची मालिकाच सुरू झाल्याने या ऐतिहासिक तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. तटबंदीसाठी मास्टर प्लॅन तयार आहे. लाखावर निधी उपलब्ध करून देऊ, अशा पोकळ आश्वासनांचा खेळच पदाधिकारी व अधिकारी करीत आहेत. रंकाळा मजबुतीकरण व नैसर्गिक पुनर्भरण करण्याचे काम पैशांअभावी रखडल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. आज महापालिकेच्या स्थायी समिती सभापतींच्या अध्यक्षतेखाली रंकाळ्याला भेट दिलेल्या शिष्टमंडळानेही पुन्हा एकदा रंकाळ्याला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, नगरसेवक शारंगधर देशमुख, परीक्षित पन्हाळकर, रेखा पाटील, आदी उपस्थित होते. मागील वेळीप्रमाणेच रंकाळ्याप्रश्नी ‘बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात’ ठरू नये, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षभरात दोनवेळा रंकाळा तलावाच्या पश्चिमेकडील बाजूच्या कोसळलेल्या तटबंदीच्या दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी तटबंदीचा आणखी एक मोठा भाग कोसळला. ठोस उपाययोजना न राबविल्यास उद्यानाकडील तटबंदीचा आणखी मोठा भाग पाण्यात कोसळण्याची शक्यता आहे. शालिनी पॅलेससमोरील रंकाळा उद्यान परिसरात तलावाच्या आतील बाजूच्या तटबंदीमधील दोन दगडांना सांधून ठेवणाऱ्या सिमेंटचा दर्जा खराब झाल्याने तटबंदीचे दगड कोसळत असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या भेटीवेळी फरास यांना दिली.
वेळीच उपाय न योजल्यास किमान पाचशे फुटांची तटबंदी जलसमाधी घेण्याची शक्यता आहे. नारळाच्या झाडांच्या मुळांमुळे तटबंदीला धोका पोहोचत असल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे. मात्र, झाडे न तोडताही तटबंदी सुरक्षित करता येऊ शकते. तथापि, चर्चेपलीकडे महापालिकेत ठोस कारवाईसाठी काहीही होताना दिसत नसल्याची नाराजी फरास यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: 'Action Plan' for Random

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.