पंचगंगा प्रदूषणप्रश्नी ‘गोकुळ’वर कारवाई प्रस्तावित

By Admin | Updated: April 2, 2015 01:25 IST2015-04-02T00:57:05+5:302015-04-02T01:25:17+5:30

पाठपुरावा करण्याची मागणी : राजकीय दबावाला बळी पडू नका

Action on Panchaganga Pollution Report 'Gokul' proposed | पंचगंगा प्रदूषणप्रश्नी ‘गोकुळ’वर कारवाई प्रस्तावित

पंचगंगा प्रदूषणप्रश्नी ‘गोकुळ’वर कारवाई प्रस्तावित

कोल्हापूर : गोकुळ दूध संघातील दूषीत पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प बंद आहे. त्यामुळे दूषीत पाणी बाहेर सोडले जात आहे. ‘गोकुळ’ची बँक हमी यापूर्वीच जप्त केली आहे. पुढील कारवाईसाठी प्रस्ताव मुख्य कार्यालयाकडे पाठविला आहे. कारवाईसाठी बैठकीत झालेल्या चर्चेचा संदर्भ घालून पाठपुराव्याचे पत्र पाठविले जाईल, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर यांनी दिली. पंचगंगा प्रदूषण करणाऱ्या घटकांवरील कारवाईचा पाठपुरावा व उपाययोजनांसंबंधी शासकीय विश्रामगृहात बुधवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. करवीरचे प्रांताधिकारी प्रशांत पाटील अध्यक्षस्थानी होते. ‘प्रदूषण’चे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके यांची प्रमुख उपस्थिती होती. दिलीप देसाई म्हणाले, प्रदूषण करणाऱ्या बड्या धेंड्यांच्या उद्योगांवर कारवाई झाली पाहिजे. गोकुळ दूध संघातील दूषित पाणी जवळच्या ओढ्यात सोडले आहे. हे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना माहिती असूनही ठोस कारवाई का केली नाही ? ‘प्रदूषण’चे अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करीत आहेत का ? प्रक्रिया प्रकल्प किती दिवसापासून बंद आहे, किती प्रदूषित पाणी बाहेर सोडले जाते, याची माहिती घेण्यासाठी आम्हाला ‘गोकुळ’मध्ये सोडले जात नाही. त्यामुळे पंचगंगा प्रदूषणासंबंधी उपाययोजनांच्या पाठपुराव्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्त केलेल्या समितीच्या सदस्यांनी ‘गोकुळ’मध्ये जावून तपासणी करावी. पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड म्हणाले, गोकुळ शिरगावातील अन्य उद्योगांकडेही प्रक्रिया प्रकल्प नाहीत. एक आॅईलचा कारखाना आहे. त्याच्यातूनही दूषित पाणी बाहेर येत आहे.शहरालगत असलेल्या गांधीनगर वसाहतीमध्ये असलेल्या उद्योगांतून रसायनमिश्रीत पाणी पंचगंगा नदीत जावून मिसळत आहे. त्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नाही, ही गंभीर बाब असल्याचे देसाई यांनी सांगितले.


‘रंकाळा’ही पंचगंगा प्रदूषणास जबाबदार..
रंकाळा तलावातील पाणी प्रदूषित आहे. तेथील विसर्ग होणारे प्रदूषित पाणी पंचगंगा नदीत जावून मिसळत आहे. त्यामुळे पंचगंगा प्रदूषणास रंकाळा तलावही जबाबदार आहे. याकडे प्रदूषण मंडळ सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत. प्रदूषणचे अधिकारी होळकर बेजबाबदारपणे उत्तरे देऊन कारवाई टाळत आहेत, असा आरोप गायकवाड यांनी केला.

Web Title: Action on Panchaganga Pollution Report 'Gokul' proposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.