कारवाई केवळ एकावर
By Admin | Updated: August 7, 2014 00:23 IST2014-08-06T23:58:29+5:302014-08-07T00:23:30+5:30
कीटकनाशकांची १५६० दुकाने : तपासणी अहवालावर शंका

कारवाई केवळ एकावर
सांगली : जिल्ह्यात कीटकनाशक औषध विक्रेत्यांची एक हजार ५६० दुकाने असून, त्यांच्याकडून बोगस कीटकनाशके शेतकऱ्यांना विक्री होऊ नयेत म्हणून ३२ गुणनियंत्रकांची नियुक्ती केली आहे.
या गुणनियंत्रकांनी चार महिन्यात केवळ ४२ नमुने काढले असून त्यापैकी एकाच कंपनीचे कीटकनाशक अप्रमाणित आल्याचे खुद्द जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हा परिषद कृषी विकास अधिकाऱ्यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात सांगितले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी आणि कीटकनाशक कंपन्यांचे साटेलोटे असल्याचा आरोपही केल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.
एका सामाजिक संस्थेने बोगस कीटकनाशकांची सर्वाधिक विक्री सांगलीत होत आहे, बोगस कंपन्यांकडून कशा पध्दतीने कीटकनाशकांची विक्री होते याची माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी आर. जे. भोसले, कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. पांडुरंग मोहिते आदींना उपस्थित केले होते. यावेळी प्रा. डॉ. मोहिते म्हणाले की, बोगस कीटकनाशकांमुळे राज्याच्या महसूलचा तोटा होत आहेच, शिवाय बोगस कीटकनाशकांना आकर्षक नावे देऊन ती शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत. यामुळे महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कृषी महाविद्यालयाचे अधिकारीच बोगस कीटकनाशकांवर सडेतोडपणे बोलू लागल्यामुळे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. सामाजिक संस्थेने आपल्याला कशासाठी बोलाविले आहे आणि समोर बसलेल्यांना काय माहिती द्यायची, याचीही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती नव्हती. त्यामुळे अचानक उपस्थित शेतकऱ्यांना कोणती माहिती द्यायची, याबाबत अधिकाऱ्यांना काहीच कळत नव्हते. अखेर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जमदाडे यांनी, जिल्ह्यात एक हजार ५६० कीटकनाशक विक्रेत्यांची संख्या असून त्यापैकी ४१६ विक्रेत्यांची तपासणी केली असून एका कंपनीचे कीटकनाशक अप्रमाणित आले आहे.
संबंधित कंपनीवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सांगली जिल्ह्यात महिना सात ते आठ कोटी रुपयांच्या कीटकनाशकांची विक्री होत असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)