राजारामपुरीत ‘हातोडा’ अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई:
By Admin | Updated: November 20, 2014 00:02 IST2014-11-19T23:53:50+5:302014-11-20T00:02:29+5:30
राजेंद्रनगर, जगदाळे कॉलनीतही मोहीम

राजारामपुरीत ‘हातोडा’ अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई:
कोल्हापूर : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज, बुधवारी राजारामपुरी परिसरात दिवसभर अतिक्रमण हटविण्याची मोहीम जोरदारपणे राबविली. राजारामपुरी परिसर, राजेंद्रनगर, जगदाळे कॉलनी आदी भागातील बाराहून अधिक ठिकाणची अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. वाहतुकीस अडथळा करणाऱ्या टपऱ्या व बांधकामे, तसेच कंपौैड भिंती, अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याची मोहीम राजारामपुरी विभागीय कार्यालयाकडून पुढेही सुरूच राहणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी अतिक्रमणे स्वत:हून काढून सहकार्य करावे, असे आवाहन उपशहर अभियंता एस. बी. देशपांडे यांनी केले आहे. अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज राजारामपुरीतील पहिली ते चौदावी गल्ली तसेच शाहू मिल परिसरातील वाहतुकीस अडथळा करणाऱ्या इमारती व केबिन्सची पाहणी पूर्ण केली आणि त्या हटविण्यास आजपासून सुरुवात देखील केली. राजारामपुरी जनता बझारच्यासमोरील टायटस स्टोअर्सचे बांधकाम सुरू असल्याने रस्त्याच्या कडेलाच दुकान सुरू केले होते. या दुकानामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याची तक्रार आल्याने महापालिकेच्या पथकाने हे रस्त्यावरील दुकान जेसीबीच्या साहाय्याने हटविले. राजेंद्रनगर येथील डी. पी. रोडवर अनेक झोपड्यांनी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण निर्मूलन पथकाने त्यातील चार ते पाच झोपड्या हटविल्यानंतर संबंधितांनी स्वत:हून झोपड्या काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर कारवाई थांबविण्यात आली. जगदाळे कॉलनी येथील श्री. तपकिरे यांनी दुसऱ्या मजल्याचे अनधिकृत बांधकाम केले होते. महापालिकेने अनधिकृत बांधकाम केलेली तपकिरे यांची एक खोली पाडली. अशाप्रकारे अनधिकृतरित्या केलेली बांधकाम काढण्याचा सपाटा सुरूच राहणार आहे. मुख्य रस्त्यावरील आणि वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा करणाऱ्या टपऱ्या काढण्याची अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे.त्यामुळे नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. आजच्या कारवाईत उपअभियंता एस. बी. देशपांडे, कनिष्ट अभियंता एन. एस. पाटील, प्रवीण बराले, अरुण गुर्जर आदींसह १५हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी) इतर विभागीय कार्यालये सुस्त महानगरपालिकेच्या इतर सर्वच विभागीय कार्यालयांच्या अखत्यारितील परिसरात मुख्य रस्त्यांवर केबीन, ढकलगाडे, चहाच्या टपऱ्या, फळ विक्रेत्यांच्या गाड्या मोठ्या संख्येने आहेत. इतर विभागीय कार्यालये अतिक्रमणाच्या बाबतीत अद्याप सुस्तच आहेत. नगरसेवक किंवा वरिष्ठांनी आदेश दिल्याखेरीज अतिक्रमण विभाग जागचाही हलत नाही असे चित्र आहे. संपूर्ण शहराला अतिक्रमणांनी विळखा घातला असल्याने कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी कारवाई करत राजारामपुरीतील रस्त्यावर बांधण्यात आलेले आणि वाहतुकीस अडथळा ठरणारे स्टेशनरीचे एक दुकान जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले.