कृती समितीचे मिरजकर तिकटीला झेंडावंदन
By Admin | Updated: August 13, 2014 23:36 IST2014-08-13T23:11:22+5:302014-08-13T23:36:23+5:30
पालकमंत्र्यांचा निषेध : गेल्या दोन वर्षात टोलबाबत ठोस निर्णय घेण्यात अपयश

कृती समितीचे मिरजकर तिकटीला झेंडावंदन
कोल्हापूर : शहरातील टोलबाबत राज्य शासनाने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. पालकमंत्री हर्षवर्धन पाटील हे पर्यटनमंत्री असल्यासारखे कोल्हापुरला येतात. त्यांना जिल्ह्याच्या प्रश्नांबाबत काहीही देणे-घेणे नाही. याच शब्दात आज, बुधवारी येथे झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत निषेध केला.
जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ शुक्रवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त मिरजकर तिकटी चौकात हुतात्मा स्मारकाजवळ स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. सकाळी साडेनऊ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी केले आहे.
राज्य शासनाने शहरातील टोलबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यापूर्वीच कृती समितीने दिला होता. यापूर्वी नियोजनात ठरल्याप्रमाणे ८ आॅगस्ट रोजी भवानी मंडपात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आता शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाऐवजी मिरजकर तिकटी येथे ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सकाळी ८:३० ते ९ :१५ ही वेळ शासकीय ध्वजारोहणासाठी राखीव आहे. यानंतर झेंडावंदन करण्याचे बैठकीत ठरले. कोणत्याही परिस्थितीत कसल्याही प्रकारचा अवमान होणार नाही. काही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता कार्यकर्त्यांनी घ्यावी, अशी सूचना निवास साळोखे, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर यांनी केली.
यावेळी हंबीरराव मुळीक, अशोकराव साळोखे, दिलीप पवार, रामभाऊ चव्हाण, भगवान काटे, चंद्रकांत यादव, महेश जाधव, आदींसह कृती समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)