कोल्हापूर जिल्ह्यात कारवाईचा धडाका
By Admin | Updated: October 7, 2014 00:03 IST2014-10-06T23:55:00+5:302014-10-07T00:03:20+5:30
विधानसभा निवडणुक : २२७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; १०८६ जणांना समन्स

कोल्हापूर जिल्ह्यात कारवाईचा धडाका
एकनाथ पाटील - कोल्हापूर- निवडणुका शांततेत व निर्भयपणे पार पाडण्यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली. प्रतिबंधात्मक कारवाई आणि खबरदारी म्हणून परवाना असलेली शस्त्रेही जमा केली आहेत. आतापर्यंत तब्बल २२७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, १०८६ जणांना समन्स व वॉरंट बजावण्यात आले आहे.
लोकसभा निवडणूक शांततेमध्ये पार पडली होती. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नव्हता. विधानसभा निवडणूकही शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात तीन-चार उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे पोलिसांचीही कसोटी लागणार आहे. पोलिसांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यात परवाना असलेली २२६५ शस्त्रे जमा केली आहेत. आचारसंहिता सुरू झाल्यापासून बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी इचलकरंजी
येथील दोघांना अटक करून दोन रिव्हॉल्व्हर व सात जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
शहरात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत व निवडणुकीमध्ये शांतता भंग करण्याची शक्यता आहे, अशा २२७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यामध्ये १२ जणांवर ‘एमपीडीए’ लावण्यात आला आहे. पोलिसांनी फरार आरोपींची नावेही प्रसिद्ध केली असृन, दारूबंदी, जुगारासह आचारसंहिता भंगाची कारवाईही जोमाने सुरू केली आहे. निवडणूक काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी दक्षता घेतली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी
दिली. (प्रतिनिधी)
बाहेरील गुन्हेगारांवर टेहळणी
राज्यातील सर्व हद्दपार गुन्हेगारांची यादी प्रत्येक पोलीस ठाण्याला आॅनलाईन पाठविण्यात आली आहे. कोल्हापूर सोडून बाहेरील जिल्ह्यातील हद्दपार झालेले गुंड कोल्हापुरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांवर विशेष ‘वॉच’ ठेवण्यात आला आहे. त्यासाठी पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखा व गोपनीय विभागाला सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. संपूर्ण निवडणुकीचा बंदोबस्त सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आहे.
सीमारेषेवर खडा पहारा
महाराष्ट्र-कर्नाटक भागांत असलेल्या तिलारी, गगनबावडा, दाजीपूर, हिटणी, आजरा या पाच नाक्यांवर दोन अधिकाऱ्यांसह आठ ते दहा शस्त्रधारी पोलीस रात्रंदिवस खडा पहारा देत आहेत. कर्नाटकातून कोल्हापूर जिल्ह्यात दाखल होणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
बनावट नोटांवर विशेष लक्ष
निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात बनावट नोटा चलनात आणून अशिक्षित, गोरगरीब मतदारांना फसविण्याचा प्रयत्न होण्याची दाट शक्यता असल्याने विशेषत: पोलीस प्रशासनाने कमालीची खबरदारी घेतली आहे.
नाकाबंदी...
गोव्याहून येणाऱ्या चंदगड-आंबोली, कर्नाटक-कागल, राधानगरी-फोंडा आणि गगनबावडा या चार मार्गांवरून विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. या पार्श्वभूमीवर वाहनांची कागदपत्रे,तसेच मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांची ब्रेथ अॅनालायझर मशीनद्वारे तपासणी केली जात आहे. मद्य प्राशन करून गाड्या रेस करणे, कर्कश आवाज, नंबरप्लेट व वाहन परवाना नसलेल्या वाहनधारकांवर कठोर कारवाई केली जात आहे. निवडणुकीच्या वेळी एसआरपीची तुकडी व इतर सर्व प्रकारचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
जमा केलेली परवानाधारक
शस्त्रे : २२६५
समन्स व वॉरंट : १०८६
तडीपार : २२७
दारूबंदी : १०३ छापे,
१२८ आरोपींना अटक
जुगार : २३ छापे,
९४ आरोपींना अटक
आचारसंहिता भंग गुन्हे : १३
बेकायदेशीर हत्यार : १ छापा,
२ आरोपी अटक
एकूण मतदारसंघ : ३१९०
संवेदनशील मतदारसंघ : १२९
उपद्रवी मतदारसंघ : ३